उदयनराजे भोसलेंचा सरकारला घराचा आहेर; म्हणाले, मराठा समाजाची सहनशीलता पाहू नका..

जालना : (Udayanraje Bhosale On Shine-Fadnavis Government) काल जालना जिल्ह्यातील अतरवाली सराटी येथे झालेल्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज आज दिवसभर चर्चेत आला. या लाठीचार्जमध्ये गावातील अनेक नागरीक, महिला, पोलिस देखील जखमी झाले आहेत. दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले आणि शरद पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
स्वत:च्या भाषणानंतर शरद पवार यांनी उदयनराजे यांना माईक दिला. उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाची सहनशीलता पाहू नका. असं म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला असल्याचे बोललं जात आहे. सर्व समाजातील लोकांना न्याय मिळत असेल तर मराठा समाजाला न्याय का मिळत नाही. हा न्याय फार वर्षापूर्वी मिळायला हवा होता. पण तो का मिळाला नाही हे मला माहित नाही.
अन्याय झाला तर उद्रेक होणे स्वभाविक आहे. शांततेत आंदोलन सुरु ठेवावे. मी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली. त्यामुळे चर्चा करुन मागण्या सोडवण्यात येतील. ज्यांनी लाठीचार्ज केला त्या पोलिसांना निलंबित करण्यात यावे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली.