आशिया कप सामन्यांला ग्रहण! भारत-नेपाळ सामन्यावरही पावसाचे संकट, हवामान खात्याचा अंदाज

India vs Nepal Asia Cup 2023 : भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना कँडी येथील पल्लेकल स्टेडिअमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान सामना पावसाच्या व्यत्यायामुळे सामना रद्द करावा लागला होता. आता भारताच्या दुसऱ्या साखळी सामन्यावरही पावसाचे संकट ओढावले आहे. भारत आणि नेपाळ यांच्यात सोमवारी होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पल्लेकल येथे सकाळी आठ वाजता हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दुपारी दोन वाजता मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. अडीच वाजता नाणेफेक होणार आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे प्रभावित झाला होता. सामन्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाने उसंत घेतली होती. पहिला डाव व्यवस्थित झाल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला होता. पाकिस्तान संघाने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. भारताची भिस्त या सामन्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी पाऊस डोकेदुखी ठरणार आहे.