“तर शेतकरी अन् माणूस संपेल, ज्यांच्यासाठी आम्ही लढतो; तेही आमच्या पाठीशी…” विखेंची खंत

अहमदनगर : (Dr. Sujay Vikhe Patil On Sharad Pawar) मुळा-प्रवरा संस्थेसाठी प्रयत्न चालू आहेत. संस्थेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सकारात्मक आहेत. सहकार संपला तर शेतकरी व सामान्य माणूस संपेल. राजकारण संपले तर कोणी संपत नाही. राजकारणासाठी सहकार संपविण्याचे पाप कोणी केल्यास त्याला आपल्या पापाची परतफेड परमेश्वर याच आयुष्यात करायला लावेल, असा इशारा मुळा-प्रवराचे माजी अध्यक्ष खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला.
मुळा-प्रवरा सहकारी वीज संस्थेची वार्षिक सभा श्रीरामपूर येथे पार पडली. त्या सभेत बोलताना डाॅ. विखे म्हणाले की, राजकारणामुळे एखादी सहकारी संस्था कशी संपुष्टात येते, याचे मुळा-प्रवरा उत्तम उदाहरण आहे. सहकारात राजकारण आल्यानंतर सर्वात मोठी हानी मुळा-प्रवरा जाण्याने राहाता, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यांतील शेतकरी, सभासद तसेच महावितरणच्या विविध अडचणींनी त्रस्त असलेल्या नागरिकांची झाली.
मात्र, अजूनही सहकारातील राजकारण थांबायला तयार नाही. राहुरी कारखाना चालविला, तर आमच्यावर आरोप होतात. मात्र, ज्यांच्यासाठी आम्ही भूमिका घेतली ते सभासद, कर्मचारी आमच्या बाजूने उभे राहत नाहीत, हा आजचा सहकार आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार टिकविण्याची भूमिका घेतली. संस्थेच्या लढाईत आठ वर्षे त्यांनी संघर्ष केला. हा संघर्ष यापुढेही चालू ठेवू, अशी ग्वाही देत डॉ. विखे यांनी मुळा-प्रवरा, राहुरी कारखाना येथे ज्यांनी न्यायालयात जाऊन प्रशासक आणले, त्यांचेही या वेळी आभार मानले.