पुण्यात बुमराह चमकला, अब विराट बारी? भारतासमोर 256 धावांचे आव्हान

पुणे : (World Cup 2023 India vs Bangladesh) चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशची फलंदाजी ढेपाळली. भारताच्या माऱ्यापुढे बांगलादेशने निर्धारित 50 षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात 256 धावांपर्यंत मजल मारली. सलमी फलंदाज लिटन दास याने 66 तर टी हसन याने 51 धावांची खेळी केली. त्याशिवाय अखेरीस महमुदल्लाह याने 46 धावांचे महत्वाचे योगदान दिले. भारताकडून रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. सलग चौथ्या विजयासाठी भारताला 257 धावांचे आव्हान आहे.
बांगलादेशचा कर्णधार नजमुल हसन शांतो याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी हसन आणि लिटन दास यांनी बांगलादेशसाठी आक्रमक सुरुवात केली. सिराज आणि बुमराह यांचा संयमी सामना केल्यानंतर त्यांनी आक्रमक रुप घेतले. दोघांनी 14 षटकात 93 धावांची भागिदारी केली. हसन याने 43 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. या खेळीत त्याने तीन षटकार आणि पाच चौकार चोपले. तर लिटन दास याने 82 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 66 धावा चोपल्या. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतक ठोकता आले नाही.
चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशची फंलदाजी ढेपाळली. हसन आणि लिटन दास यांनी बांगलादेशच्या गोलंदाजीचा पाया रचला होता. पण मधल्या षटकात भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केले. कुलदीप, जाडेजा आणि सिराज यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना ठराविक अंतराने माघारी धाडले. कर्णधार नजमुल हसन शांतो याला फक्त आठ धावा करता आल्या. त्यासाठी त्याने 17 चेंडू खर्च केले. तर मेहदी हसन मिराज याला तीन धावांवर सिराजने तंबूत धाडले. तोहिद ह्दय याने 16 धावांचे योगदान दिले. त्याला शार्दूल ठाकूर याने तंबूचा रस्ता दाखवला. तोहित ह्दय याने 16 धावांसाठी 35 चेंडू खर्च केले. यामध्ये एकही चौकार त्याला मारता आला नाही. अनुभवी मशुफिकुर रहीम याला चांगल्या सुरुवातीनंतर विकेट फेकली. रहीम याने 46 चेंडूत एक चौकार आणि एका षटकारांच्या मदतीने 38 धावांचे योगदान दिले. रहीमला जसप्रीत बुमराहने तंबूत पाठवले.
एकापाठोपाठ एख विकेट पडल्यानंतर बांगलादेशचा डाव लवकर आटोपणार असेच वाटत होते. पण नसुम अहमद, महमुदल्लाह यांनी बांगलादेशसाठी फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात त्यांनी धावगती वाढवली. नसुम आणि महमुदल्लाह यांनी 26 चेंडूत 32 धावांची भागिदारी केली. नसुमने 14 धावांची खेळी करत महमुदल्लाह याला चांगली साथ दिली. नसुम बाद झाल्यानंतर महमुदल्लाह यांने बांगलादेशची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. महमुदल्लाह याने अखेरीस 36 चेंडूमध्ये 46 धावांची खेळी केली. यामध्ये तीन षटकार आणि तीन चौकारांचा समावेश आहे. बांगलादेशचा संघ 256 धावांपर्यंत मजल मारु शकला.