ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…अन् बदल घडवा या ब्रीदवाक्यानुसारच आम्ही कार्यरत”, काकांसमोर पुतण्याची टिप्पणी

पुणे : (Sharad Pawar On Ajit Pawar) ‘शिका, नेतृत्व करा आणि बदल घडवा…’ हे विद्या प्रतिष्ठानचे ब्रीदवाक्य आहे आणि ब्रीदवाक्यानुसारच आम्ही काम करत आहोत, अशी टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर केली तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या. विद्या प्रतिष्ठानच्या दौंड येथील अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी अजित पवार यांनी हे भाष्य केले. कोणतेही राजकीय भाष्य करण्याचे टाळून अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी संस्थेची प्रगती विषद केली. शरद पवार यांच्या समोरच त्यांनी कर्मचाऱ्यांना दम देऊन चांगले काम करण्याच्या सूचना केल्या.

अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांनी शेती क्षेत्रासाठी कृषी विकास प्रतिष्ठानची आणि शिक्षणाकरिता विद्या प्रतिष्ठानची स्थापना केली. पुणे आणि पुणे जिल्ह्यामध्ये या संस्थेचे मोठे जाळे आहे. इंदापूरमध्येही शाळेची शाखा सुरु झाल्याने ही इंग्रजी माध्यमाची शाळा आम्ही पवार साहेबांच्या माध्यमातून सुरू केली. गुणवत्ता जोपासण्यासाठी आणि गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करत असतो. अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळेच्या इमारतीचे एक लाख चौरस फुटांचे बांधकाम झालेले आहे. अनंतराव पवार यांच्या नावाने ही शाळा आहे. त्यांच्या नावाला साजेसे शिक्षण येथे दिले गेले पाहिजे. जर कुणी कमी पडले तर माझ्याशी गाठ आहे. येथे शिक्षण घेणारा विद्यार्थी लाथ मारीन तिथे पाणी काढेल, असा घडला पाहिजे, असा दम अजित पवारांनी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना भरला.

शरद पवार म्हणाले की, १९७२ साली संस्था काढली, सध्या संस्थेत ३२ हजार विद्यार्थी आहेत. त्यातील १५ हजार मुली आहेत. संस्थेचे अनेक वसतिगृहे आहेत. शाळेतील मुले जगाच्या पाठीवर जाऊन नाव कमावत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे सर्व क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल होत आहेत. तुमच्या उसामध्ये किती साखर आहे. त्याची तोडणी कधी करायची हे सर्व एआय सांगू शकेल. शेतीवर येणाऱ्या संकटाची माहिती देखील एआयच्या माध्यमातून दिली जाते. अशाप्रकारचा एक विभाग आपण संस्थेमध्ये सुरु केला आहे.

वयाच्या २६ व्या वर्षी मी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी उभा ठाकलो होते. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याने जोर लावला होता. त्यामुळे लढाई सोपी नव्हती. पण, काहींच्या मदतीने मी मोठ्या मतांनी विजयी झालो. त्यावेळी तात्यासाहेबांनी आणि आप्पासाहेबांनी मला पाठिंबा दिला. त्यांची मदत मी कधीही विसरु शकत नाही, अशा आठवणींना शरद पवार यांनी उजाळा दिला. “सुप्रिया सुळे यांची संस्था दरवर्षी अडीचशे मुलांना शिष्यवृत्ती देते. हे करत असताना त्यांनी कधीच स्वत:चा विचार केला नाही. आम्ही कधीच याची जाहिरातबाजी केली नाही” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये