चांदणी चौकातील नव्या पुलाच्या कामाची पोलखोल; काहीच महिन्यात पुलावर खड्डे; NHAI चा मात्र भलताच दावा

पुणे : (Chandani Chawk Flyover) कोट्यवधी रुपये खर्चून चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या पुलावर अवघ्या काहीच दिवसांत खड्डे पडाय़ला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचं दिसून येत आहे. बॉम्बचे मोठे ब्लास्ट करुन चांदणी चौकातील जुना पूल पडला नव्हता. मात्र, नव्या पुलावर वाहतूक सुरु होऊन काहीच महिने झाले आहेत आणि खड्डे पडायला सुरुवात झाल्यानं या पुलाच्या कामाचं पितळ उघडं पडलं आहे.
खासदार सुप्रिया सुळेंनी यासंदर्भात ट्विट केलं आहे आणि त्यांनी अशा मोठ्या प्रकल्पाच्या रस्त्यावर काही महिन्यातच खड्डा पडणं अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे, असं त्यांनी म्हटलंय. ‘चांदनी चौकातून एनडीएपासून मुळशीकडे जाणाऱ्या नव्या रस्त्यावर हा असा खड्डा पडला आहे. ‘एनएचएआय’ने हे काम तपासून पाहण्याची गरज आहे. या रस्त्याचे उद्घाटन होऊन अद्याप वर्ष देखील उलटले नाही तोवर हि स्थिती झाली. रस्त्याच्या या अशा कामामुळे प्रवाशांची सुरक्षा देखील धोक्यात आली आहे. ही अतिशय गंभीर व खेदजनक बाब आहे’, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
पुलाचे दोन भाग एकमेकांना जोडण्यासाठी वेळ लागतो. हे भाग नीट जोडले गेले नाहीत त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, असं NHAI कडून सांगण्यात आलं आहे आणि रस्त्यावर खड्डे पडणं म्हणजे फार गंभीर नाही, असा दावादेखील NHAI कडून केला जात आहे. लवकरच या खड्ड्यावर काम करुन लोखंडी सळई टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
चांदणी चौकातील पुलावर पहिल्या दिवसापासून टीका होत आहे. भुलभुलैया रस्त्या झाला आहे आणि शिवाय काम पूर्ण व्हायच्या आधीच याचं उद्घाटन करण्याची घाई केली असंही बोललं गेलं आहे. मात्र आता या पुलावर खड्डे पडल्याचं दिसत आहे. NHAI कडून सारवासारव केली जात आहे. मात्र खड्डे दिसताच NHAI ने साधं डांबर टाकून बुजवले आहेत.