दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरु

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असतानाच भाजपने दिल्ली विधानसभेची तयारी सुरू केली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने दिल्लीसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी जाहीर केले आहेत. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार वैजयंत पांडा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश प्रभारी म्हणून तर खासदार अतुल गर्ग यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मान्यतेने राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी नियुक्त्या जारी केल्या आहेत.
म्हणून भाजपची लवकर तयारी?
केंद्रात आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. असे असले तरी भाजपला मागच्या अडीच दशकापासून दिल्ली विधानसभा काबीज करता आली नाही. मागील पंधरा वर्षे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत आहे. त्यापूर्वी दहा वर्ष शीला दीक्षित यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे एकीकडे केंद्रासह अनेक राज्य ताब्यात असताना दिल्ली मिळवता येत नाही, हे भाजपचे दुखणे आहे. म्हणूनच अन्य पक्ष महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमध्ये संपूर्ण ताकद पणाला लावत असताना भाजपने या दोन राज्यांसोबतच राजधानी दिल्लीतही तयारी सुरू केली आहे.