राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरियात राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान

भारत आणि अल्जेरियादरम्यान आर्थिक सहकार्य वाढवण्याचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आहे. अल्जेरियाचा वेगाने होत असलेला विकास आणि विस्तारत असलेल्या अर्थकारणामुळे विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
भारत आणि अल्जेरियादरम्यान वार्षिक १.७ अब्ज डॉलरची व्यापारी उलाढाल होते मात्र व्यापाऱ्याच्या अनेक संधींचा अजून वापर केला जाऊ शकलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारत-अल्जेरिया आर्थिक मंचाला सोमवारी त्या संबोधित करत होत्या. मुर्मू यांना आज अल्जियर्समधील सिदी अब्देल्लाह सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोल युनिव्हर्सिटीने राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली. अल्जेरियाचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्री कमल बद्दरी यांनी मुर्मू यांना डॉक्टरेट प्रदान केली.
अल्जेरियातील दौऱ्याच्या आपल्या अखेरच्या दिवशी राष्ट्रपती मुर्मू विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सी वॉटर डिसेलिनेशन प्रोजेक्ट साइट आणि रोमन साम्राज्याच्या अवशेषांना भेट दिली. राष्ट्रपती टिपाजाच्या विलायाकडे रवाना झाल्या आणि समाधीला भेट दिली. त्यांनी हम्मा गार्डनला भेट दिली आणि तेथे एक रोपटे देखील लावले. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मॉरिटानियाला रवाना होणार आहेत. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान मलावीला भेट देतील.