काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होणार? विद्यमान ३० आमदारांच्या उमेदवारीची शक्यता

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार असलेल्या ३० हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे. काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहे त्यापैकी 30 हून अधिक नावांची घोषणा पहिल्या यादीत केली जाणार असल्याची माहिती आहे. गुरूवारी रात्री काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
पुढील चार दिवसात जागावाटपावर अंतिम निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तारखा मंगळवारी जाहीर झाल्या पण महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कधी होणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. एबीपी माझाला वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीच्या जवळपास २४० आणि महाविकास आघाडीच्या २२० जागा निश्चित झाल्या आहेत. पुढच्या २ ते ३ दिवसांत हे जागावाटपही होईल. तसंच महायुतीचे उरलेले ४८ आणि महाविकास आघाडीमध्ये ६८ जागांवर अजूनही पेच कायम आहे. मात्र २० तारखेपर्यंत म्हणजेच पुढील चार दिवसांत हे जागावाटप पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.
महाविकास आघाडीचे जागावाटप याच आठवड्यात जाहीर करून उमेदवारांच्या नावासंदर्भात सुद्धा महाविकास आघाडीतील पक्ष निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. जागावाटप जाहीर करण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावर महत्वपूर्ण बैठका होणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये अजूनही तिढा असलेल्या जवळपास 40 जागांवर पुन्हा एकदा बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. अधिकाधिक जागांचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून पुढील दोन दिवसात प्रयत्न केला जाणार आहेत. निवडणुकीसाठी अवघे ३५ दिवस राहिलेले असताना तातडीने जागावाटप जाहीर करून उमेदवारांच्या याद्या याच आठवड्यात महाविकास आघाडीचे पक्ष जाहीर करू शकतात.