वांद्रे पूर्व विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाईंच्या नावाची घोषणा

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला मुंबईमध्ये जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता वांद्रे पूर्व मतदारासंघातून ठाकरे गटाने वरुण सरदेसाई यांना तिकीट जाहीर केले आहे.
ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात यासंदर्भात घोषणा केली. उद्धव साहेबांनी वांद्रे पूर्व विधानसभेचे उमेदवार म्हणून वरुण सरनाईक यांचे नाव निश्चित केले आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. त्यामुळे आता वांद्रे पूर्व विधानसभेत झिशान सिद्दीकी विरुद्ध वरुण सरदेसाई यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.
कोण आहेत वरुण सरदेसाई ?
वरुण सरदेसाई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या बहिणीचे पुत्र आहेत. म्हणजेच ते आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत.वरुण सरदेसाई यांच्याकडे शिवसेनेच्या युवासेनेची सचिवपदाची जबाबदारी आहे. तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.