राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यात येणार

शासनाकडून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला अपार आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथम प्राधान्याने यू-डायस प्रणालीमधून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अपार आयडी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरपर्यंतची डेडलाइन देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिले आहेत.
आर. विमला यांनी दिलेल्या निर्देशानुसार, केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्यासाठी कळविण्यात आले असून, यू-डायस सॉफ्टवेअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अपार आयडी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी. अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण जिल्ह्याचे सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याचे एमआयएस समन्वयक यांना देण्यात आल्या असून, शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यासाठी कळविले आहे.
अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने शिक्षक-पालक बैठक शाळास्तरावर आयोजित करून पालकांकडून ना हरकत प्रमाणपत्र भरून घेण्यात यावे. अपार आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावरून प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज आढावा घेण्यात यावा. अपार आयडी तयार करण्याचा राज्य स्तरावरून दररोज आढावा घेण्यात येईल. तसेच, विद्या समिक्षा केंद्रामार्फत त्याचा आढावा घेण्यात येईल. याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावरून अपार आयडी तयार करण्याबाबत दररोज आढावा घेण्यात यावा आणि हा अहवाल विभागीय उपसंचालक, शिक्षण संचालक, आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठविण्यात यावा.
अपार आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी हा आयडी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करून घ्यावा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक आठवड्याला आढावा घेऊन ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना अपार आयडी तयार करून दिले नाहीत. त्यांचा अहवाल आयुक्त कार्यालयास आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयास पाठविण्यात यावा, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.