भाजपकडून गटनेता निवडीसाठी निरीक्षकांची नियुक्ती; निर्मला सीतारामन, विजय रुपाणी यांच्यावर जबाबदारी

महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा कायम आहे. दरम्यान, भाजपने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांची महाराष्ट्राचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे केंद्रीय निरीक्षक उद्या राज्यात येणार असून ४ डिसेंबरला भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे.
भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय निरीक्षक उद्या मुंबईत दाखल होतील. याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागले आहेत. दरम्यान, येथील आझाद मैदानावर सध्या शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी प्रशासनाने चालवली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस झाले आहेत. तरीही अद्याप राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या बैठका रद्द केल्यात. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तास्थापनेबाबतच्या चर्चेसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावाची होणार घोषणा
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव नक्की करण्यात आले आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या नावाला मान्यता दिली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रविवारी रात्री दिली.