माजी परराष्ट्र मंत्री एस.एम कृष्णा यांचे निधन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा (SM Krishna Passes Away) यांचे मंगळवारी (१० डिसेंबर) पहाटे २.४५ वाजता राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी मद्दूर येथे नेण्यात येणार आहे. सोमनहल्ली मल्लैया कृष्णा यांच्या पश्चात पत्नी प्रेमा आणि दोन मुली शांभवी, मालविका असा परिवार आहे.
सुरुवातीचं शिक्षण
एस एम कृष्णा यांचा जन्म १ मे १९३२ रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील सोमनहल्ली येथे झाला. कृष्णा यांनी कायद्याची पदवी घेतली. त्यांनी डॅलस, टेक्सास येथील ‘सदर्न मेथोडिस्ट विद्यापीठ’ आणि वॉशिंग्टन, डीसी येथील ‘जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात’ शिक्षण घेतलं. येथील लॉ स्कूलमधून त्यांनी पदवी प्राप्त केली. १९६२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून मद्दूर विधानसभेची जागा जिंकून त्यांनी राजकारणात आपली कारकीर्द सुरू केली.
कृष्णा यांनी डिसेंबर १९८९ ते जानेवारी १९९३ पर्यंत कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम केलं. १९७१ ते २०१४ दरम्यान ते अनेकदा लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्यही होते. एस एम कृष्णा हे कर्नाटक विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हींचे सदस्य होते आणि त्यांनी उपमुख्यमंत्री (१९९३ ते १९९४ ) म्हणूनही काम केलं होतं.
राजकीय कारकीर्द
१९९९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एस एम कृष्णा हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यात पक्षाचा विजय झाला. ते मुख्यमंत्री झाले. कृष्णा हे ११ ऑक्टोबर १९९९ ते २८ मे २००४ पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात २००९ ते २०१२ या काळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम केलं. त्यानंतर ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते प्रजा सोशालिस्ट पार्टीशी संबंधित होते. मार्च २०१७ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.