पूर रोखण्यासाठी आयुक्तांचे नवे आदेश; अल्पकालीन व दीर्घकालीन आराखडा तयार करणार

नुकताच सिंहगड रोड परिसरात पूर आल्याने महापालिका आणि पाटबंधारे विभागातही आरोपप्रत्यारोप झाले होते. त्यामुळे पुराचे खरे कारण शोधण्यासाठी आयुक्त भोसले यांनी चार सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर आज महापालिकेत याची पहिली बैठक झाली.
पुणे शहरात निर्माण होणारी पूरस्थितीची कारणे शोधणारा अहवाल तयार केल्यानंतर त्याचा आता अल्पकालीन व दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. यासंदर्भात नुकतिच महापालिकेत महापालिका व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाल्याने जुलै महिन्यातच धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला. नदीपात्रात ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती निर्माण झाली. सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी येथे शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने संसार वाहून गेले.नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तसेच डेक्कन, खिलारे वस्ती, पाटील इस्टेट या परिसरातही पूरस्थिती उद्भवली होती.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, समितीचे सदस्य, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पुढच्या वर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी अल्पकालीन कामे करण्याची सूचना केली. तर भविष्यातील धोका टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
अल्पकालीन उपाययोजना
- नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे, नदीपात्रातील राडारोडा काढणे
- नदीपात्रातील राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई करणे
- कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित विभागासह क्षेत्रीय कार्यालय, अतिक्रमण विभाग
- या विभागांनी कारवाई सुरु करावी
- दीर्घकालीन उपाययोजना
- पाण्याच्या प्रवाहाला अडथळा ठरणारी अनावश्यक बंधारे काढणे
- पूरग्रस्त होणाऱ्या भागाचे स्थलांतर करणे एकतानगरी येथील घरांचे क्लस्टर डेव्हलपमेंट करणे
- पुराच्या पाण्यास रोखण्यासाठी सीमा भिंत बांधणे
- नदीपात्रात झालेली अवैध बांधकामे काढून टाकणे
- याचा सविस्तर आराखडा तयार करून कारवाई व उपाययोजनांचे नियोजन करणे