वैभवचा डबल गोल्डन धमाका

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : वॉटर पोलोमध्ये महिलांना सुवर्ण, छकुलीचे दुसरे रौप्य
अहमदाबाद : राष्ट्रीय योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी सर्वोत्तम आणि चित्तथरारक आसन करून पदकांचा डबल धमाका उडवला. वैभवने योगासनाच्या आर्टिस्टिक वैयक्तिक इव्हेंट मध्ये सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला.यासह त्याने स्पर्धेत डबल गोल्डन धमाका उडवला. त्यापाठोपाठ छकुली महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये रौप्यपदकाची मानकरी ठरली. तसेच पूर्वा किनारेने आपल्या संघाला कांस्यपदक मिळवून दिले. यासह महाराष्ट्र संघाने यंदा नव्याने समावेश करण्यात आलेल्या योगासन खेळ प्रकारात दोन दिवसात पाच पदकांची कमाई केली. यामध्ये वैभवच्या दोन सुवर्ण आणि छकुलीच्या दोन रौप्य पदकाचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राला या पारंपरिक खेळ प्रकारात आपले वर्चस्व अबाधित ठेवता आले. वैभवने आपले सोनेरी यशाची लय कायम ठेवत शनिवारी सकाळच्या सत्रात महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाने खाते उघडून दिले. त्याने पुरुषांच्या आर्टिस्टिक गटामध्ये फायनल गाठली. या फायनल मध्ये त्याने चित्तथरारक आणि लवचिकतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत १३६.५२ गुणांची कामगिरी केली. या सह तो या गटामध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. त्याने शुक्रवारी पारंपरिक आसन प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्या पाठोपाठ तो आता आर्टिस्टिक वैयक्तिक गटात किताब विजेता ठरला.


पूर्वाने उघडले पदकाचे खाते-रत्नागिरी येथील युवा योगपटू पूर्वा किनारे हिने पदार्पणात राष्ट्रीय स्पर्धेत पदकाचे खाते उघडले. तिने महिलांच्या आर्टिस्टिक वैयक्तिक गटामध्ये कांस्य पदक जिंकले. तिने १२६.६८ गुणांची कमाई करत तिसऱ्या स्थानी धडक मारली. अवघ्या एका गुणाच्या पिछाडीने तिचे रौप्य पदक हुकले.

महिला : महाराष्ट्राच्या महिला वॉटर पोलोपटू आज येथे किमयागार ठरल्या. दोन गोलच्या पिछाडीनंतर महाराष्ट्राच्या महिलांनी अफलातून खेळ करीत अंतिम सामन्यात केरळ संघाविरूद्ध ५-३ गोलने रोमहर्षक विजय नोंदविला. सनसनाटी विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या महिलांनी या स्पर्धेत मणिपूरचा २५-० असा धुव्वा उडविला तसेच त्यांनी कर्नाटक (८-१) आणि पश्चिम बंगाल (५-४) या बलाढ्य संघांविरुद्धही शानदार विजय मिळविला. महाराष्ट्र संघाकडून कोमल किरावे, मानसी गावडे, पूजा कुमरे आणि गोलरक्षक संजिली वानखेडे यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांना सायली गुढेकर, रूपल भुजादे, राजश्री गुगळे, साची शहा, तन्वी मुळे, रूचिता कदम,याना अगरवाल, नीम शुक्ला, सेजल मनोहर यांची बहुमोल साथ लाभली. या संघास विलास देशमुख व रणजित श्रोत्रीय यांनी मार्गदर्शन केले होते.

वॉटर पोलो : पुरूष : महाराष्ट्राच्या पुरुष संघाला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. ब्रॉंझपदकाच्या लढतीत त्यांनी बलाढ्य पश्चिम बंगाल संघावर ८-७ असा रोमहर्षक विजय मिळविला. महाराष्ट्र संघाच्या या विजयात मंदार भोईर, श्रेयस वैद्य, सारंग वैद्य, अक्षयकुमार कुंडे, अश्विनीकुमार कुंडे, उदय उत्तेकर, मनीष खोमणे, पियुष सूर्यवंशी, अर्जुन कावळे, प्रतीक अजमिरे, भूषण पाटील, गौरव महाजन, मित संपत यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.

ज्युदो : महाराष्ट्राची ज्युदोपटू स्नेहल खावरे हिने स्पर्धेच्या कांस्यपदक पटकावले. ५२ किलोपेक्षा कमी वजन गटात स्नेहल खावरे हिने कांस्य पदकाची कमाई केली.

सायकलिंग : महाराष्ट्राच्या पुजा दानोळेने ८० किमी मास स्टार्ट प्रकारात कांस्यपदक जिंकले.

जलतरण : शुक्रवारी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने चार बाय शंभर मीटर्स मिश्र फ्री स्टाईल शर्यतीत रौप्यपदक जिंकले. या संघात वेदांत माधवन, अवंतिका चव्हाण, दिवा पंजाबी व हीर शहा यांचा समावेश होता. या संघाने हे अंतर तीन मिनिटे ४७.८१ सेकंदात पार केले.

मल्लखांब : महाराष्ट्राने मल्लखांब स्पर्धेतील पुरुषांच्या सांघिक विभागात १३१.५ गुण संपादन करून रौप्यपदक जिंकले. महाराष्ट्र संघाकडून अक्षय सरळ, शुभंकर खवले, आदित्य पाटील, दीपक शिंदे, सागर राणे व कृष्णा आंबेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

सॉफ्टबॉल : महाराष्ट्राच्या सॉफ्टबॉल पुरुष संघाने सलामीची लढत जिंकून स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड सुरू केली. महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघावर ९-० होमरनने धुव्वा उडविला. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे स्थगित करण्यात आलेले सामने शनिवारी खेळवण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र संघ मध्य प्रदेश संघाविरुद्ध १-० असा आघाडीवर होता. महाराष्ट्र संघाने ९-० होमरनने दणदणीत विजय साकारत आगेकूच केली आहे. या लढतीत सुमेध तळवेलकर याने दोन, कल्पेश कोल्हे याने दोन होमरन काढले. धीरज बाविस्कर याने एक होमरन काढला. तसेच महाराष्ट्र संघाचा पिचर पवन गुंजाळची पिचिंगची कामगिरी उत्कृष्ट ठरली. पवन गुंजाळने मध्य प्रदेश संघाचा एकही रन होऊ दिला नाही.

हॉकी : आंतरराष्ट्रीय खेळाडू युवराज वाल्मिकी यांनी नोंदविलेल्या दोन गोलांच्या जोरावर महाराष्ट्राने झारखंड संघाचे आव्हान ३-१ गोलने संपुष्टात आणले आणि पुरुषांच्या हॉकीत उपांत्य फेरीकडे वाटचाल केली. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत झारखंड विरुद्ध महाराष्ट्राची बाजू बळकट होती. आठव्या मिनिटालाच महाराष्ट्राच्या तालेब शेख याने संघाचे खाते उघडले. या गोलच्या धक्क्यातून झारखंडचा संघ सावरत नाही तोच युवराजने आणखी एक गोल चढवीत महाराष्ट्राला २-० असे आघाडीवर नेले.पहिल्या पंधरा मिनिटाच्या महाराष्ट्राचे वर्चस्व होते. तथापि १७ व्या मिनिटाला झारखंडच्या बिरसा ओरेया याने अप्रतिम गोल करीत महाराष्ट्राची आघाडी कमी केली आणि सामन्यातील रंगत वाढवली. त्यानंतर बराच वेळ महाराष्ट्राकडे २-१ अशी आघाडी होती. ३६ व्या मिनिटाला पुन्हा युवराजला सूर गवसला. त्याने झारखंडच्या पेनल्टी एरियात प्रवेश करीत खणखणीत फटका मारून महाराष्ट्राचा तिसरा गोल केला.