देखणे कुटुंब आपलेपणाचा भाव जपणारे!
पुणे : संतसाहित्य, लोकवाङ्मय अतिशय प्रगल्भ आहे. यातील नेमके काय घ्यावे आणि ते सहजसोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचावे, यासाठी डॉ. रामचंद्र देखणे अखेरच्या श्वासापर्यंत कार्यमग्न राहिले. त्यांनी आयुष्यभर संतसाहित्याचा भावार्थ सांगितला. तो वारसा पुढच्या पिढीलाही दिला, असे प्रतिपादन माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे संतसाहित्य, लोकवाङ्मयाचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांना विद्यावाचस्पती (पीएचडी) प्राप्त झाल्याबद्दल डॉ. रामचंद्र देखणे (मरणोत्तर), कन्या डॉ. पद्मश्री धनंजय जोशी, पुत्र डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे व स्नूषा डॉ. पूजा भावार्थ देखणे यांचा डॉ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी पाटील बोलत होते. हभप प्रमोदमहाराज जगताप, हभप शिवाजीराव मोरेमहाराज, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी उपस्थित होते.
श्रीनिवास पाटील यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. रामचंद्राची वीणा भावार्थने हाती घेतली, पूजाने ती सांभाळली. देखणे कुटुंब आपलेपणाचा भाव जपणारे आहे. आपल्या प्रवचन, कीर्तन, भारुडातून त्यांनी लोकप्रबोधन केले, असे पाटील म्हणाले. प्रमोदमहाराज जगताप म्हणाले, ‘‘देखणे यांनी ज्ञानेश्वरी संागितलीच; पण ते ज्ञानेश्वरी जगले. त्यांची वाणी आणि लेखणी समृद्ध होती. एकाच घरात चार सरस्वतीपुत्र हा चतुर्विध पुरुषार्थ आहे.’’
या वेळी डॉ. भावार्थ देखणे यांनी ‘जीवनाची सुंदरता’ या विषयावर प्रवचन केले. जीवनाचे तत्त्वज्ञान आपण त्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, त्यावर अवलंबून असते, असे भावार्थ देखणे म्हणाले. सत्काराला उत्तर देताना डॉ. पूजा देखणे म्हणाल्या, की बाबांनी आम्हाला पीएचडीसाठी प्रोत्साहन दिले. कौतुक करणे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी ठरवलेल्या तारखेला हा कार्यक्रम होतोय, याचा आनंद वाटतो. आमच्याकडे अभिमानाची परंपरा नाही, पण परंपरेचा अभिमान आहे. विठ्ठल काटे यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. मकरंद टिल्लू यांनी आभार मानले.