सिटी अपडेट्स

‘माझी मिळकत, माझी आकारणी’ योजनेचे नवीन पाऊल

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बर्‍याच मिळकती नव्याने उभारण्यात आल्या असून कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे काही नव्याने उभारण्यात आलेल्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही. कोरोना साथरोगाच्या कालावधीमध्ये महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढविणे आवश्यक आहे. ज्या मिळकतींची करआकारणी झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणी करण्यासाठी महापालिकेने धोरण निश्चित केलेले आहे.

महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या नवीन अथवा वाढीव बांधकाम झालेल्या मिळकतींची करआकारणी अद्याप झालेली नाही, अशा मिळकतींची करआकारणीसाठी जर मिळकतधारक स्वयंस्फूर्तीने स्वत: बांधकामांची नोंद करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने अर्ज करीत असेल तर अशा नागरिकांना प्रोत्साहन व मिळकतकरामध्ये महापालिकेकडून ५ टक्के सवलत देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली आहे. ही योजना गेल्या वर्षी लागू केलेली असली तरी या योजनेचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे.

स्वतः आकारणी करून स्वतःच ती आकारणी अंतिम टप्प्यापर्यंत नेणे हे या योजनेतील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल आहे. लोकशाहीमध्ये लोकांना कुठल्याही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हे महत्त्वाचे असते. लोकांच्या विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून प्रशासकीय यंत्रणा प्रतिसादशील व गतिमान करण्याचे मोठे उद्दिष्ट गाठण्याचा हा एक महत्त्वाचा प्रयत्न असल्याचे राजेश पाटील यांनी सांगितले. मालमत्ता कर हा नागरी संस्थांसाठी उत्पन्नाचा स्रोत आहे. स्थानिक नगरपालिका संस्था काही महत्त्वाच्या सेवा-सुविधा पुरवतात.

मालमत्ता कर हा महानगरपालिका संस्थांना ती प्रदान करत असलेल्या सर्व सेवा सुविधांसाठी महसूल मिळवून देतो. महानगरपालिका संस्थांच्या उत्पन्नाचे हे प्रमुख स्रोत आहे. म्हणून अचल मालमत्तेच्या मालकांना करपात्र मूल्यावर कर भरणे अनिवार्य असते आणि मालमत्ता कर भरला नाही तर देय वसूल करण्यासाठी कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये