वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्या

पुणे : पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीजयंत्रणा धोकादायक आढळून आल्यास त्याची माहिती नागरिकांनी मोबाइलच्या व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली तालुका, तसेच मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, जुन्नर व आंबेगाव तालुक्यांसाठी ७८७५७६७१२३ तसेच बारामती मंडल अंतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, भोर व पुरंदर या तालुक्यांसाठी ७८७५७६८०७४ हा व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांक महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्यास त्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. नागरिकांनी या क्रमांकावर कॉल करण्याऐवजी फक्त धोकादायक वीजयंत्रणेची माहिती व्हॉट्सअॅपद्वारे द्यावी.
तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअॅप नाही त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाइल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे. महावितरणची वीजतार तुटलेली आहे. झोल किंवा जमिनीवर लोंबकळत आहे. फ्यूज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकण उघडे किंवा तुटलेले आहे. रोहित्रांचे कुंपण उघडे आहे. भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, मुसळधार व संततधार पावसामुळे माती वाहून गेल्याने किंवा अन्य कारणांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण झाला आहे, इत्यादी स्वरूपाची माहिती/तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह महावितरणच्या व्हॉट्सअॅप मोबाइल क्रमांकावर पाठवता येणार आहे. यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावरदेखील संपर्क साधून धोकादायक यंत्रणेची माहिती देण्याची सेवा उपलब्ध आहे. व्हॉट्सअॅपद्वारे महावितरणला नादुरुस्त किंवा धोकादायक वीजयंत्रणेची माहिती प्राप्त होताच ती ताबडतोब संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयांना पाठविण्यात येत आहे.