सुपरहीट ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रिओ कपाडिया यांचं दुःखद निधन
बऱ्याच सुपरहीट चित्रपटांमध्ये आपल्या छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांवर छाप पाडणारे अभिनेते रिओ कपाडिया यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. काल म्हणजेच १३ सप्टेंबर रोजी रिओ यांचं निधन झाल्याच्या बातमीची त्यांचा मित्र फैजल मलिक यांनी पुष्टी केली आहे. या बातमीमुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रिओ यांनी ‘दिल चाहता है’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘चक दे इंडिया’सारख्या काही सुपरहीट चित्रपटात काम केलं. याबरोबरच त्यांनी एकता कपूरच्या ‘क्योकी सांस भी कभी बहू थी’ या टेलिव्हिजन मालिकेपासून ओटीटी वरील ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांत काम केलं आहे.
६६ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने काम करण्यास इच्छुक असणाऱ्या रिओ यांच्या कुटुंबानेही त्यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. रात्री १२.३० वाजता रिओ यांनी अखेरचा श्वास घेतला. १५ सप्टेंबर रोजी रिओ यांच्यावर गोरेगाव येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
रिओ यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रिओ हे अत्यंत फिट होते. नुकतेच ते स्वित्झर्लंडला फिरायला गेले असताना तिथे असलेल्या यश चोप्रा यांच्या पुतळ्याबरोबर एक फोटोही त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.