“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दु:ख”

रायगड | Aditya Thackeray On Shinde’s Group – शिवसेनेचे आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांवर हल्लाबोल केला आहे. “गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला, याचं मला दु:ख आहे. आपल्याला देश पुढे न्यायचा आहे. आपलं फक्त प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत. माणुसकीसोबत गद्दारी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण त्या गद्दारांनी ठाकरे परिवाराला राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला,” असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा आज (17 ऑगस्ट) सुरू झाला. ते आज एक दिवसाच्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. रायगडमध्ये पोहोचल्यानंतर झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधताना शिंदे गटातील आमदारांवर जोरदार टीका केली.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मी या देशात पहिलाच आमदार असेन जे राजकारणात बऱ्याच गोष्टी पाहिल्या. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रायगडला 600 कोटी देण्यात आले आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपला गेम झाला हे गद्दारांच्या तोंडावर दिसत होतं. देवेंद्र फडणवीस हेच खरे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री नाहीत. मंत्रिमंडळात रायगडचे कुणी नाही, महिला कुणी नाही. खाते वाटपात निष्ठेला कुठेही स्थान नाही. बंडखोरीच्या वेळी गेलेल्या पहिल्या बॅचमधील खूप कमी जणांना मंत्रीपद मिळालं.