कृषीमंत्री दादा भुसेंसमोर धर्मसंकट;पक्षनिष्ठा की मित्रप्रेम
नाशिक : (Dada Bhuse On Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे काय निर्णय घेणार या विषयी मतदार संघासह जिल्ह्यात उत्सुकता आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरीत होवून शिवसेनेच्या मुशीत वाढलेल्या भुसे यांचे शिंदे यांच्याशी मैत्रिपूर्ण संबंध सर्वश्रूत आहेत.
यातच ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही झाल्यानंतर या मैत्रीला चारचॉंद लागले. त्या पार्श्वभुमीवर पक्षनिष्ठा की मित्रप्रेम हा निर्णय घेणे म्हणजे भुसे यांच्यासमोर मोठे धर्मसंकट आहे. दुसरीकडे पक्ष नेतृत्वाने अतिशय अटीतटीच्या वेळेत कृषीमंत्री पदाची जबाबदारी सोपवून भुसे यांच्यावर विश्वास दाखविला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशीही भुसे यांची जवळीक आहे.
दरम्यान, माध्यमांमध्ये भुसे नॉट रिचेबल या आशयाचे वृत्त आले होते. मात्र, भुसे आपल्या शासकीय निवासस्थानी होते. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीसही ते उपस्थित होते. भुसे, राठोड यांनी मुख्यमंञ्यांना शिंदे यांचा प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. मात्र ते म्हणाले, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. प्रस्ताव घेऊन जाण्याएवढा मोठा नेता नाही.