ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

अजित पवार यांची आता भाजपवर कुरघोडी

पुणे | Maharashtra Politics – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याच्या प्रश्नावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर कुरघोड्या सुरू केल्या आहेत. आता लक्ष भाजप (BJP) नेते काय पाऊल उचलतात याकडे आहे.

यापूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रुममध्ये बैठक घेतली. हा राजशिष्टाचाराचा भंग होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रयत्नपूर्वक पडदा टाकला. परंतु, अजित पवार यांच्या कार्यपद्धतीत फरक पडलेला नाही असे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या वादात दिसून आले आहे. वास्तविक जिल्ह्याचा पालकमंत्री हा जिल्ह्याबाहेरचा असावा, असे संकेत आहेत. हे संकेत धुडकावून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय वजनाचा फायदा घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद काँग्रेस आघाडी सरकार असतानाही मिळवले होते. भाजपचे सरकार आलं तेव्हा आमदार गिरीश बापट यांना खूश करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बापट यांना दिले होते. सध्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री आहेत. ते ही पुन्हा याच जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आहेत.

जिल्ह्याबाहेरचा लोकप्रतिनिधी हा पालकमंत्री असावा हा संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप या दोघांनीही सातत्याने धुडकावून लावला आहे आणि आता त्याच पालकमंत्री पदासाठी पुणे जिल्ह्यातील अजित पवार आणि चंद्रकांत पाटील या दोन नेत्यांमध्ये संघर्ष चालू झाला आहे.

आगामी निवडणुकीच्या वर्षात पालकमंत्री पद आपापल्या पक्षाच्या हातात राहावे हे त्यामागचे इंगीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि अजित पवार यांच्यासह नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आले. पवार यांना उपमुख्य मंत्री पद देण्यात आलं तेव्हाच चंद्रकांत पाटील यांचे राजकीय महत्व कमी होणार हे चाणाक्ष राजकारण्यांनी ओळखले होते. अजित पवार यांना मानणारे अनेक अधिकारी जिल्हा प्रशासनात आहेत. तो अधिकारी वर्ग पाटील यांच्यापेक्षा अजित पवार यांच्याकडेच झुकलेला राहील हे उघड आहे आणि अपेक्षेप्रमाणे महिना दोन महिन्यात दोन्ही दादांमध्ये संघर्षाची ठिणगी पडली.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. पाटील यांचा स्वभाव सौम्य असला तरी त्यांच्यावर कुरघोडी करणं म्हणजे भाजपवर कुरघोडी करणं असं मानलं जातं. अजित पवार यांनी विकास कामांसाठी स्वतंत्र बैठक घेतली त्याचवेळी भाजपच्या नेत्यांनी आक्षेप कसा घेतला नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गणेशोत्सवात रात्री बारा वाजेपर्यंत मेट्रो धावेल, अशी घोषणा अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी जाहीर करून टाकली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये