…”म्हणणारे लोक बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघालेत; दिघेंचं मोठं वक्तव्य

मुंबई : (Kedar Dighe On Eknath Shinde) तोंडावर आलेल्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांमध्ये शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवा अशी मागणी बंडखोर शिंदे गटाचे वकिल नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे केली. मात्र, त्यांची ही मागणी खंडपीठानं अमान्य करत, पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला होईल तोपर्यंत निवडणूक आयोगाने धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावा, याचा निर्णय घेऊ नये, असे महत्वाचे निर्देश न्यायालयाने दिले.
शिंदे गटाने वकिलांमार्फत न्यायालयात धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या केलेल्या मागणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. शिंदे गटाच्या याच भूमिकेवर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी सडकून टीका केली आहे. आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे धनुष्यबाण चिन्ह गोठवा म्हणतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केलाय.
दरम्यान, शिंदे गट बंडखोरी केल्यापासून माध्यमांना प्रतिक्रिया देताना किंवा जनसभेला संबोधित करताना वारंवार आम्ही खरी शिवसेना असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंचे वकिल न्यायायलात थेट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची निशाणी गोठवायला निघाले आहेत. हाच धागा पकडून केदार दिघे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. शिंदे गट धनुष्यबाणाला इतके का घाबरले? बाळासाहेबांचे विचार घेऊन जाणारे, आम्हीच खरी शिवसेना म्हणणारे, बाळासाहेबांचीच निशाणी गोठवायला निघाले आहेत, अशा शब्दात केदार दिघे यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे.