“पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे आता हे…”, अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

अहमदनगर | Ajit Pawar On CM Eknath Shinde – सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान अनेक नेतेमंडळींकडील गणेशोत्सवाला दिग्गजांची हजेरी लागताना दिसत आहे. यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अनेकांच्या घरच्या गणपतींचं दर्शन घेताना दिसत आहे. यावरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, गणेश उत्सव हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. पण याआधी कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, असा खोचक टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे.
पुढे शिवतीर्थ मैदानासंदर्भामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, दोघांनाही दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागण्याचा आधिकार आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रातील जनता पाहत होती की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिनतीर्थावरच दसरा मेळावा घ्यायचे. याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की ही शिवसेना यापुढे उद्धव ठाकरे पाहतील. मात्र सध्याच्या राजकीय घडामोडी घडल्यात, ते सगळ्यांनी पाहिलं आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते त्यांना पाहिजे त्या पद्धतीने निर्णय घेतात. पण दसरा मेळावा झाल्यानंतर लक्षात येईल खरी शिवसेना कोणाची.