महात्मा गांधी प्रेरणादायी जीवनाचा वस्तुपाठ

डॉ. विजय भटकर यांचे प्रतिपादन : ‘गांधीयन फिलॉसॉफी अॅवॉर्ड’ प्रदान
पुणे : ‘‘महात्मा गांधी आदर्श, प्रेरणादायी जीवनाचा वस्तुपाठ आहे. त्यांचे विचार आपण दैनंदिन जीवनात, तंत्रज्ञानाचा वापर करताना अवलंबित करायला हवेत,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केले.
या वेळी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, उद्योजक रामदास माने, उद्योजिका सुप्रिया बडवे, माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, सुनील पारेख, शांताराम जाधव, शांतिदूत परिवाराचे डॉ. विठ्ठल गायकवाड, तृषाली जाधव, विद्या जाधव, डॉ. सागर देशपांडे, ‘सूर्यदत्त’चे कार्यकारी संचालक प्रा.अक्षित कुशल आदी उपस्थित होते. रमेश पाचंगे व सहकाऱ्यांनी सनई-चौघडा वादन केले. डॉ. विजय भटकर म्हणाले, “गांधींच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही आनंदाची गोष्ट आहे. पुण्यात आलो तेव्हा मला बहुपयोगी महासंगणक बनविण्याची जबाबदारी दिली होती. अमेरिकेने महासंगणक नाकारल्याने भारताने हे आव्हान पेलले होते. हे तंत्रज्ञान विकसित केले. या देशातील ७० ते ८० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित करायचे ध्येय होते.
आतापर्यंतचे पुरस्कारार्थी
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संचालित ‘सूर्यदत्त ग्लोबल पीस रिसर्च फाउंडेशनच्या वतीने बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात डॉ. विजय भटकर यांना पाचवे ‘गांधीयन फिलॉसॉफी अॅवाॅर्ड’ प्रदान करण्यात आले. यापूर्वी हा पुरस्कार जैन इरिगेशनचे भवरलाल जैन, गांधी अभ्यासक डॉ. कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते डॉ. सत्यवृत्त शास्त्री यांना प्रदान करण्यात आला आहे.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, ‘‘सूर्यदत्त शिक्षण संस्थेने गांधी विचारांचा आदर्श घेऊन गेली दोन दशके कार्य उभारले आहे. आमच्या विद्यार्थी-शिक्षकांमध्ये हे विचार रुजावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. डॉ. विजय भटकर हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. गांधीजींच्या प्रमाणेच साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. संगणक क्षेत्रातील त्यांचे योगदान भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकांचे आयुष्य फुलले. भारताला आत्मनिर्भर बनविण्यात डॉ. भाटकर यांनी मोठा हातभार लावला आहे.