अजित पवारांचा मुंबईला जाण्याचा निर्णय, मुख्यमंत्र्यांकडून खास शासकीय विमानाची सोय; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
नागपूर | Ajit Pawar – सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच गदारोळ सुरू आहे. अशातच एकीकडे अधिवेशन सुरू असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नागपूरहून मुंबईला रवाना होणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अजित पवार यांच्यासाठी शासकीय विमानाची सोय करणार आहेत. याबाबत स्वत: अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते आज (28 डिसेंबर) नागपुरात माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जामीन मिळालेला आहे. ते आज तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यांना मुंबईबाहेर जाता येणार नाही, असा आदेश न्यायालयानं दिलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना सांगलीहून मुंबईत येण्यास सांगितलं आहे.”
“माझा देखील मुंबईला जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सगळं होत असताना मला काल शिंदे साहेबांनी उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक घेत असल्याचं सांगितलं. उद्याऐवजी परवा बैठक घेतली तर बरं पडेल, असं मी मुख्यमंत्र्यांना म्हटलं. कारण मी अकरा वाजताच निघणार होतो. तर यावर त्यांनी सांगितलं की दहा वाजता कामकाज सल्लागार समितीची बैठक लावतो. मी तुम्हाला शासनाचं विमान उपलब्ध करुन देतो. त्यातून तुम्ही जा आणि काय काम आहे ते करुन परत या. त्यामुळे मी माझा कार्यक्रम बदलला आहे. शासनाच्या विमानानं दिलीप वळसे पाटील आणि मी दुपारी एक वाजता मुंबईला जाणार आहोत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “शासनाचं विमान कोणी वापरावं हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो. मी पण विरोधी पक्षनेता आहे. मला देखील कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. आम्ही देखील सत्तेत असताना कधी काही प्रसंग आला तर एकमेकांना सहकार्य करायचो. त्यामुळे कदाचित मी दुपारी एक वाजता शासनानं उपलब्ध करुन दिलेल्या विमानानं मुंबईत जाण्याचा आणि त्याच विमानानं परत येण्याचं माझं नियोजन आहे”, असंही अजित पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, आज (28 डिसेंबर) माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. आता अनिल देशमुख यांची तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी सुटका होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची (CBI) मागणी फेटाळली आहे.