“…तर दूध का दूध, पाणी का पाणी झालं पाहीजे”, शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई | Ajit Pawar –शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांचा आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) यांच्यासोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसंच याप्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून आरोपींना अटकही झाली. मात्र, याचे पडसाद थेट विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडले आहेत. आमदार यामिनी जाधव यांनी शीतल म्हात्रेंचा व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (13 मार्च) सभागृहात बोलत होते. (Sheetal Mhatre Viral Video)
अजित पवार म्हणाले की, “राजकीय क्षेत्रात असो किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करताना स्वतःचं चारित्र्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आमच्याकडे लोकं ‘पब्लिक फिगर’ म्हणून पाहत असतात. त्यामुळे राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात, मतमतांतरं असू शकतात. मला त्याबद्दल खोलात जायचं नाही.”
“कुठल्याही लोकप्रतिनिधीनं काहीही केलं नसताना कुणी जाणीवपूर्वक असे प्रकार केले, त्यामागे कुणी मास्टरमाईंड असेल, तर आमचं स्पष्ट मत आहे की, याची चौकशी झाली पाहिजे. यावर ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ झालं पाहिजे. वस्तूस्थिती नेमकी काय आहे हे लोकांना आणि सभागृहाला कळली पाहिजे,” अशी मागणी अजित पवारांनी यावेळी केली.