अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी अखेर बॉयफ्रेंड समर सिंह अटकेत

Akanksha Dubey Case : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या (Akanksha Dubey) आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. आकांक्षा दुबेने रविवारी 26 मार्च रोजी वाराणसी इथं हॉटेलमध्ये गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या आत्महत्येस भोजपुरी गायक समर सिंह याला कुटुंबाने जबाबदार ठरवले होते. त्याच्याविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल करण्यात आली होती. आता तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आकांक्षा दुबेच्या आत्महत्येप्रकरणी गायक समर सिंहला वाराणसी पोलिसांनी गाझियाबाद इथून अटक केली. समरवर आकांक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
बॉयफ्रेंडला अटक
आकांक्षा दुबे आणि समर सिंह हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असं म्हटलं जात आहे. समरच्या अटकेनंतर आता पोलीस त्याचा भाऊ संजयचा शोध घेत आहेत. वाराणसीहून आलेल्या पोलिसांच्या एका पथकाने मध्यरात्री 12 वाजता समरला अटक केल्याची माहिती गाझियाबादच्या एसपींनी दिली. अटकेपासून वाचण्यासाठी समर सिंह हा नंदग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सोसायटीमध्ये लपून बसला होता. त्याच्याविरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.