तुझ्यात जीव रंगला! पाठकबाई-राणादा अडकले लग्नाच्या बेडीत

मुंबई | Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding – ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणा दा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (Hardeek Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लगीनघाईचे फोटो समोर येत होते. तसंच आज (2 डिसेंबर) हार्दिक आणि अक्षया लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
पुण्यात अक्षया आणि हार्दिकचा शाही विवाहसोहळा थाटात पार पडला. मित्रपरिवार, कुटुंबीय व नातेवाईकांच्या उपस्थितीत अक्षया-हार्दिकचा विवाहसोहळा पार पडला असून त्यांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अक्षयानं लग्नासाठी खास हातमागावर विणलेली लाल रंगाची नऊवारी पैठणी साडी नेसत पारंपरिक लूक केला होता. तर हार्दिकही कुर्ता आणि धोतरमध्ये राजबिंडा दिसत होता. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
दरम्यान, अक्षया आणि हार्दिक ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचले आहेत. या मालिकेत त्यांनी साकारलेली राणादा आणि पाठकबाई ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. तसंच गेल्या काही दिवसांपासून अक्षया- हार्दिकच्या लग्नासाठी चाहते उत्सुक होते. आता राणादा-पाठकबाई विवाहबंधनात अडकल्यानंतर चाहत्यांकडूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
2 Comments