राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचाराचा आरोप, महिलेनं लिहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र!

मुंबई | Rahul Shewale Rape Allegations – शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेनं अत्याचाराचा आरोप केला आहे. तसंच या महिलेनं यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. “माझी विनंती ऐकली नाही आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही तर आपल्यासमोर आयुष्य संपवण्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही,” असं या महिलेनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
संबंधित महिलेने एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “खासदार राहुल शेवाळे लग्नाच्या बहाण्याने 2020 पासून आपल्यावर बलात्कार करत असून मानसिक त्रास देत आहेत. आपला आणि पत्नीचा कधीही घटस्फोट होऊ शकतो. आमच्या दोघांमध्ये काहीही ठीक नाही, असं राहुल शेवाळे यांनी आपल्याला सांगितलं.” “शेवाळे यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत आपण त्यांचा प्रेमाचा प्रस्ताव स्वीकारला,” असं या महिलेनं सांगितलं आहे.
दरम्यान, राहुल शेवाळे यांच्यावरील आरोपांनुसार, “शेवाळे आणि संबंधित महिला हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी अनेकदा भेटले होते. राहुल शेवाळे या महिलेला जेवणासाठी बोलवायचे आणि लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक संबंध ठेवायचे.” मात्र, पोलिसांशी यासंदर्भात संपर्क केला असता, या प्रकरणाची कुठलीही तक्रार अद्याप आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच महिलेचं हे ट्विटर अकाऊंट अधिकृत आहे का याची खात्रीही केली जात आहे. तसंच काही दिवसांपूर्वी शेवाळे यांनी न्यायालयाच्या तक्रारीच्या आधारावर साकीनाका पोलीस ठाण्यात महिलेविरोधात खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.