पुणेमहाराष्ट्र

मोदींच्या सभेच्या वेळेस मित्रपक्ष करणार जोरदार शक्ती प्रदर्शन

पुण्यातील मोदींच्या सभेवेळी जोरदार शक्तिप्रदर्शनाचे नियोजन भाजपसह महायुतीत सहभागी मित्रपक्षांच्या वतीने करण्यात आले आहे. सभेच्या नियोजनासाठी भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये शहरातील आठ मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांनी किती कार्यकर्ते आणायचे, याचे नियोजन करण्यात आले. प्रत्येक विधानसभा अध्यक्षावर याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सभेसाठी एक लाखापेक्षा अधिक नागरिक येतील, असे नियोजन केल्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत जाऊन मोदी यांच्या सभेसाठी उपस्थित राहण्याची विशेष निमंत्रण पत्रिका नागरिकांना वाटली आहे. दीड लाख नागरिकांना याचे वाटप करण्यात आले आहे, असे घाटे यांनी सांगितले. सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील प्रचारसभा आठ नोव्हेंबरपासून घेत आहेत. चार दिवसांत पंतप्रधान मोदींच्या नऊ प्रचारसभांचे नियोजन केले आहे. सभांची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून झाली. आतापर्यंत धुळे, नाशिक, नांदेड, अकोला येथे त्यांच्या सभा झाल्या आहेत. १२ नोव्हेंबरला पुणे, १३ नोव्हेंबरला सोलापूर आणि कोल्हापूर येथे सभा पार पडेल. तसेच, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबई येथे १४ नोव्हेंबरला सभांचे नियोजन आहे.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाणी न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यासाठी पुणे दौऱ्यावर येणार होते. या कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन मोदी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या वतीने केले होते. जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारीही केली होती. मात्र, मोदी यांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशी शहरात जोरदार पाऊस झाला. वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने सुरक्षिततेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारांवर आत्तापासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. या मैदानावर एक लाख खुर्च्या असतील, असे सांगण्यात येत आहे. सभेला शहर, जिल्ह्यासह सातारामधूनही कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित राहतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये