जे.पी. नड्डांची एक चूक अन् दानवेंचा सुचक इशारा; म्हणाले, यापुढे महाराष्ट्रात येताना…;
औरंगाबाद : (Ambadas Danve On J.P. Nadda) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपच्या सोमवार दि. 2 रोजी झालेल्या सभेवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सभा सुरु असताना मैदानातून बाहेर पडणाऱ्या महिलांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत दानवे यांनी हल्लाबोल केला होता. जे.पी. नड्डा यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्याऐवजी बाळासाहेब देवरस असा केला. त्यामुळं अंबादास दानवे यांनी जे.पी. नड्डा आणि भाजपवर हल्लाबोल केला.
नड्डाजी, यापुढे महाराष्ट्रात येताना ‘बाळासाहेब ठाकरे’ हे नाव पाठ करून या. आज सभेत आपण त्यांचा ‘बाळासाहेब देवरस’ असा उल्लेख केला. जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते त्यांच्या धगधगत्या विचारांचा वारसा काय सांभाळणार!, असा सवाल अंबादास दानवे यांनी जे,पी नड्डा यांना केला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्याचे सांगणार शिंदे गट काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र असं ठरलं होतं. उद्धव ठाकरेंनी भाजपला खुर्चीसाठी धोका दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी बाळासाहेब देवरस यांचे नाव घेत म्हणाले, देवसर यांनी ज्या काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात लढा दिला त्यांच्यासोबत सरकार स्थापन केलं, असं जे.पी. नड्डा म्हणाले. अंबादास दानवे यांनी याच मुद्यावर बोट ठेवत जे.पी. नड्डा यांच्यावर टीका केली आहे.
जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणे! सर्वाधिक रिकाम्या खुर्च्या असल्याचा विक्रम पण आज भाजपच्या नावे नोंदवला गेला असावा, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. दानवेंनी आपल्या एका ट्विटमध्ये जे पी नड्डा यांचा उल्लेख करत ” लोक आपले भाषण सुरू होण्यापूर्वीच खुर्च्या सोडून गेले. संभाजीनगर फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आहे.. हे आज तुमच्याच साक्षीने जनतेने अधोरेखित करून टाकले आहे,” असं, अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.