खेडमधील विविध गावात नदीप्रदूषण विषयक पथनाट्याचे सादरीकरण

सद्यस्थितीत नदी प्रदूषण हा अत्यंत कळीचा विषय आहे. विविध कारणाने नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या आहेत व त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले असून, पुढील काळात हे मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर असणार आहे. भारतात ज्या अनके नद्या दूषित झाल्या आहेत त्यात भीमा नदी ही आहे. भीमा नदीचे प्रदूषण हा सद्यस्थितीत अत्यंत गंभीर विषय झाला आहे. सध्या जगभरात नोव्हेंबर महिना हा ग्लोबल अक्शन म्हणून साजरा केला गेला आहे. या महिन्याचे हे औचित्य साधत विविध पर्यावरण विषयक उपक्रम सादर करून हा महिना संपूर्ण जगभरात साजरा केला गेला आहे.
या पार्श्वभूमीवर वर्क फॉर इक्वालिटी व पर्यावरण मित्र या सामाजिक संस्थाच्या पुढाकारातून राजगुरुनगर तालुक्यातील विविध माध्यमिक व महाविद्यालयात शिकत असलेल्या युवतींना एकत्रित करत नदीप्रदूषण विषयक पथनाट्य बसवण्यात आले.सामाजिक जाणीव जागृती करणेसाठी पथनाट्य हे प्रभावी माध्यम असल्याने संस्थेने या पथनाट्याच्या माध्यमातून मुले-मुली व ग्रामस्थ यांच्यात जागृती करण्याचे ठरवले होते. त्यानुसार खेड तालुक्यातील खरपुडी, मांजरेवाडी(धर्म), रेटवडी,निमगाव, पाईट, कुरकुंडी, शिरोली,चांदूस या विद्यालयात हे पथनाट्य सादर करण्यात आले.या पथनाट्याच्या माध्यमातून सुमारे १००० युवा-युवती, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यापर्यंत नदीप्रदूषण थांबवणे कसे गरजेचे आहे? हा विचार पोहचवण्यात आला.
या पथनाट्यात मुख्यत नदीच्या प्रदुषणाची कारणे की ज्यामध्ये नदीनाल्यात जनावरे धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांचे पाणी सोडणे, कचरा टाकणे,सांडपाणी सोडणे, निर्माल्य टाकणे, अशी कारणे दाखवत असतानाच नदीचे प्रदूषण कसे कमी करता येईल अशी मांडणी ही या पथनाट्यात केली आहे.पथनाट्य संपल्यानंतर नदीचे प्रदूषण थांबावे यासाठी प्रशासनाकडे काही मागण्या करण्यात आल्या आहेत या मागण्यांना पाठिंबा म्हणून शेकडो मुले-मुली
व शिक्षक यांनी स्वाक्षरी केल्या.