Breaking News : अंबादास दानवे आमदार संजय शिरसाटांवर गुन्हा दाखल करणार, पाहा काय आहे सुषमा अंधारे प्रकरण?
मुंबई | Ambadas Danve On Sanjay Shirsat – ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वाद चांगलाच वाढत चालला आहे. दोन्ही गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सत्र सुरू आहेत. अशातच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत. संजय शिरसाट यांनी शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या वक्तव्याविरोधात अंबादास दानवे गुन्हा दाखल करणार असल्याचं म्हणाले आहेत.
अंबादास दानवे यांनी संजय शिरसाटांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. सुषमा अंधारेंविषयी केलेल्या वक्तव्यावरून हा गुन्हा दाखल करणार असल्याचं दानवेंनी सांगितलं. शिरसाटांनी केलेलं वक्तव्य गुन्हेगारी प्रवृत्तीचं आणि क्रिमिनल लॉ मध्ये बसणारे आहे. त्यामुळे आपण छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार देणार असून कायदेशीर प्रक्रियेत कोणता गुन्हा दाखल होतो हे देखील त्यांना आम्ही सांगणार आहोत, असंही दानवे म्हणाले.
संजय शिरसाट सुषमा अंधारेंविरोधात नेमकं काय म्हणाले?
सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट म्हणाले की, “ती बाई म्हणते सगळे माझे भाऊ आहेत. अब्दुल सत्तार माझे भाऊ आहेत, भुमरे पण माझे भाऊ आहेत. पण तिनं काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीती. अरे पण तू आहेस तरी कोण? शिवसेनेसाठी आम्ही आमची 38 वर्षे घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करता आणि काही उरलेले लोक टाळ्या वाजवतात.”