ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्र

पालखी सोहळ्याकरिता रुग्णवाहिका व टँकर रवाना; दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे उपक्रम

पुणे ः संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्यासोबत वारकर्‍यांच्या सेवेकरिता चार सुसज्ज रुग्णवाहिका आणि दोन टँकर पुण्यातून रवाना झाले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत या उपक्रमाची सुरुवात झाली असून, यंदा ट्रस्टच्या १३० व्या वर्षानिमित्त मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स, औषधे व आरोग्यविषयक सेवा पालखी सोहळा समारोपापर्यंत विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरासमोर रुग्णवाहिकेचे पूजन करून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष व उपक्रमाचे नियोजन करणारे डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे यांसह ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, अक्षय गोडसे, राजाभाऊ घोडके, राजाभाऊ पायमोडे, ज्ञानेश्वर रासने, बाळासाहेब सातपुते, विजय चव्हाण, गजानन धावडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा ३३ वे वर्ष आहे. रुग्णवाहिकेसोबत डॉ. सुरेश जैन, डॉ.राहुल दवंडे, डॉ. रामेश्वर मुंडे, डॉ.सुमिता चक्रवार, डॉ.दिलीप सातव यांची टीम पुण्यातून रवाना झाली आहे.

डॉ. परांजपे म्हणाले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत, लोणीमार्गे जाणार्‍या संत तुकाराम महाराज पालखी आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यासोबत या रुग्णवाहिका व टँकर असणार आहेत. कित्येक किलोमीटरचा पायी प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत, आरोग्यविषयक सेवा त्वरित मिळाव्यात, याकरिता या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये