देश - विदेश

समान नागरी कायद्याबाबत अमित शहांचं मोठं विधान; म्हणाले…

भोपाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत. भोपाळमध्ये भाजप नेत्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, सीएए, राम मंदिर, कलम ३७० आणि ट्रिपल तलाक यांसारख्या मुद्द्यांवर निर्णय झाले आहेत. आता समान नागरी कायद्याची वेळ आली आहे. या आधी त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांना विचारलं की, देशात सर्वकाही ठीक झालं काय? यानंतर त्यांनी समान नागरी कायद्याची चर्चा केली.

दरम्यान, पक्ष कार्यालयात कोअर कमिटी आणि प्रमुख नेत्यांसोबत अनौपचारिक बैठकीत शहांनी सांगितलं की, उत्तराखंडमध्ये हे पथदर्शी कार्यक्रमांतर्गत लागू केलं जात आहे. मसुदा तयार केला जात आहे. शिल्लक राहिलेलं काम योग्य पद्धतीनं पूर्ण केलं जाईल. मात्र, तुम्ही लोकांनी पक्षाला नुकसान होईल, असं कोणतंही काम करु नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी राज्यातील नेते मंडळींना दिल्या.

जातीयवाद हे देशाचं वास्तव आहे. या हिशोबानं प्रत्येक जातीच्या नेत्याला पद आणि महत्त्व द्यावं लागेल. मध्य प्रदेशमधील २०१८ च्या पराभवाबाबत शहा म्हणाले, विधानसभा निवडणूक भाजप हरली. मात्र, मतांचा टक्का जास्त होता. चुका झाल्या, त्याचा आढावाही घेतला. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नानं जनमत वाढत आहे. या प्रयत्नांत संघटनेची भूमिका आवश्यक आहे. केवळ सरकारच्या कामांनी निवडणूक जिंकली जात नाही. बळकट संघटनाच निवडणूक जिंकून देईल, असंही शहांनी स्पष्ट केलं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये