‘ठाकरे मंत्रिमंडळात’ काम करण्याची इच्छा, ‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं भुवया उंचावणारं विधान!

कल्याण : (Amit Thackeray In Join Thackeray Government) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौरा ठाणे जिल्ह्यात सुरु आहे. कल्याणमधील विद्यार्थ्यांशी आज अमित ठाकरेंनी संवाद साधला. त्यांना शिंदे-फडणवीस कॅबिनेटमध्ये मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी या अफवा असल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मात्र, आता खुद्द अमित ठाकरे यांनाच तुम्हाला मंत्रिपदावर काम करण्याची इच्छा आहे का? असा सवाल विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी हसून या प्रश्नाचं उत्तर दिलं. मला राज साहेबांच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल.
थोडक्यात, अमित यांना ‘ठाकरे मंत्रिमंडळात’ काम करण्याची इच्छा आहे. मात्र हे काका उद्धव ठाकरे यांचं मंत्रिमंडळ नसून, आपले वडील राज ठाकरे यांनी सरकार स्थापन केल्यावर तयार होणारं मंत्रिमंडळ असेल, असंही अमित यांना यावेळी सुचवायचं आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना सुपुत्र आदित्य ठाकरे कॅबिनेटमध्ये मंत्री होते, त्याप्रमाणेच राज ठाकरे-अमित ठाकरे यांची जोडी दिसेल.
अमित ठाकरे यांनी कल्याणमध्ये विद्यार्थी, युवक-युवती यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली, त्याचप्रमाणे त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यानंतर विद्यार्थ्यांना अमित ठाकरे यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळं सगळे विद्यार्थी यांच्यासोबत व्यस्त झाले तर अमित ठाकरे यांनी देखील या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून आनंद व्यक्त केला.