सलमान नंतर आता अमिताभ बच्चन यांच्याही सुरक्षेत वाढ; ‘हे’ आहे कारण
मुंबई | Amitabh Bachchan – काल (1 नोव्हेंबर) बाॅलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) जीवाला धोका असल्यानं त्याला वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तसंच त्याच्यानंतर आता बाॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याही सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना यापुढील काळात एक्स दर्जाची सुरक्षा मुंबई पोलिसांकडून दिली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याआधी अमिताभ यांना केवळ सामान्य दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. तसंच बाॅलिवूडमधील काही अभिनेत्यांना देखील सातत्यानं धमक्या मिळत आहेत त्यामुळे मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. अमिताभ हे बाॅलिवूड विश्वातील मोठे सेलिब्रेटी असून त्यांची लोकप्रियता मोठी आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या नावाभोवती असणारे वलय याचा विचार करुन हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान, इंटेलिजन्स डिपार्टमेंटकडून कुणाला सुरक्षा द्यायची आणि कुणाला नाही याचा निर्णय घेतला जातो. त्यांनी केलेल्या सर्व्हेनुसार संबंधित व्यक्तीबाबत अहवाल सादर केला जातो. त्या व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे हा मुद्दा देखील विचारात घेतला जातो. तसंच अमिताभ यांच्यापूर्वी अक्षय कुमारला देखील एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.