‘छत्रपती संभाजी महाराज की जय’चा जयघोष कानावर पडतो तेव्हा…”,डॉ. कोल्हे यांची भावना
नाशिक : जेव्हा प्रेक्षकांमधून ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ चा जयघोष कानावर पडतो, तेव्हा क्षणात सर्व थकवा दूर होऊन काळीज भरून येते, अशी भावना अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. लेखक व दिग्दर्शक महेंद्र महाडीक लिखित व दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचे आयोजन २१ ते २६ जानेवारी रोजी नाशिकच्या तपोवनामधील स्व. बाबूशेठ केला मैदानावर करण्यात आले आहे. महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी साधुग्राममधील महानाट्य होत असलेल्या जागेस भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी झालेले काम पाहून समाधान व्यक्त करत संबंधितांना काही सूचनाही केल्या. या वेळी संवाद साधताना डॉ. कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून बलीदानापर्यंतचा धगधगता इतिहास पुन्हा जाणून घेण्यासाठी नाशिककरांनी सहकुटुंब या महानाट्याचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावण्याचे आवाहन केले.
प्रयोगाच्या चार दिवस आधीच नाशिककरांनी तिकिटे खरेदीसाठी दिलेल्या मोठ्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. नाशिककरांच्या मोठ्या प्रतिसादामुळे राज्यभरात या महानाट्याची नोंद घेतली जाईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.