“सध्या फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या नंबरवर फेकलेत; शिंदे साहेब लवकरच…”: मिटकरी

मुंबई – Maharashtra Politics : महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्ली दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी हा दौरा करण्यात आल्याची माहिती आहे. दिल्लीत शिंदे आणि फडणवीस यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलेलं दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना ट्विटच्या माध्यमातून खोचक टोला लगावला आहे. मला विश्वास आहे शिंदे साहेब नक्कीच भाजपची उरली सुरली लोकप्रियता संपवतील असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
“महाराष्ट्रातील भाजपची सध्यस्थिती पाहता मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळे श्री देवेंद्र फडणवीस दुसऱ्या, चंद्रकांत पाटील तिसऱ्या तर इतर भाजप नेते चौथ्या व पुढच्या नंबर वर फेकले गेलेत. विश्वास आहे शिंदे साहेब भाजपची जनमानसातील उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील.” असं खोचक ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटातील किती नेत्यांना आणि कोणती मंत्रिपदे मिळतील त्याचबरोबर मुख्यमंत्रीपद नसताना भाजपमधील किती आणि कोणत्या नेत्यांना कोणती मंत्रिपदे मिळतील याकडे लक्ष असणार आहे.