ताज्या बातम्यारणधुमाळी

महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना अमोल मिटकरींनी ट्विट करत दिलं उत्तर; म्हणाले…

मुंबई : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद चांगलाच पेटला आहे. सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद मेळाव्यात अमोल मिटकरींनी केलेल्या भाषणामधील वक्तव्यांवरुन सध्या वाद पेटला आहे. मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु आहे. गुरुवारी पुण्यात ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन करण्यात आलं असता वातावरण चांगलंच तापलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून यासंबंधी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. यादरम्यान अमोल मिटकरी यांनी या वादावर ट्विट करत उत्तर दिलं आहे.

सांगलीतल्या सभेत बोलताना मिटकरींनी भाषणात बोलताना एक किस्सा सांगितला होता. “आपला बहुजन समाज कधी दुरुस्त होईल काय माहित. आचमन करा…”, असं म्हणत मिटकरींनी मंचावर बसलेले मंत्री धनंजय मुंडेंचं नाव घेत पुढे बोलणं सुरु ठेवलं. “मुंडे साहेब एका ठिकाणी गेलो मी मुलीचा बाप म्हणाला बसा साहेब कन्यादान आहे. म्हटलं अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. कन्या काय दान करण्याचा विषय असतो का हो? नाही म्हणे असतो ना… आम्हाला शिकवलंय असतो. बसा म्हणाले मी बसलो खुर्चीवर. बरं नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली,” असं मिटकरी यांनी सांगितलं.

यानंतर मिटकरी काही मंत्र म्हणाले. नंतर त्यांनी लग्न लावणारे ब्राह्मण (गुरुजी) सांगतात त्याप्रमाणे डोळ्याला पाणी लावा असं सांगितलं. नंतर ते गुरुजींच्या शैलीमध्येच, “तुमचा हात माझ्या हातात द्या,” असं म्हणाले. हे ऐकून मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे हसू लागले. पुढे बोलताना मिटकरींनी, “आचमन करा, धुपम्, दिपम् नमस्कारम्…” असं म्हणत पुन्हा मंत्र म्हटले. मंत्र म्हणताना त्यांनी, “मम भार्या समर्पयामि” असं वाक्य म्हटलं. मिटकरींनी पुढे बोलताना, “मी नवरदेवाच्या कानात सांगितलं. म्हटलं अरे येड्या ते महाराज असं म्हणतायत.. मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, समर्पयामि म्हणजे घेऊन जा.” यानंतर सर्वच उपस्थित हसू लागले. “आरारा… कधी सुधरणार आपण. ही लोक आम्हाला हनुमान चालीसा सांगायला लागली,” असंही मिटकरी म्हणाले.

मिटकरींच्या या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना अमोल मिटकरी यांनी माफी मागणार नसल्याचं म्हटलं आहे.

तसंच राज्यात वाद पेटला असताना अमोल मिटकरी यांनी “वाचा मौनस्य श्रेष्ठम् ll….” असं ट्वीट करत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे. अमोल मिटकरी यांनी यामधून मौन बाळगणं योग्य असल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये