पुणे

सुषमा अंधारे यांच्यामुळे मित्र पक्षात नाराजीचा सूर 

आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी हडपसर विधानसभा मतदारसंघ आपल्याच पक्षाला मिळणार असल्याचा दावा केला होता. त्यावर आता शहरात चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अंधारे यांना विचारणा करण्यात येणार असल्याचे सांगत नाराजीचा सूर दिसून आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही यावेळी सावध पवित्रा घेत अंधारे यांच्या विधानाचे खापर माध्यमांवर फोडले आहे.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सद्या विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. बैठक होत आहेत. दरम्यान, अंधारे यांनी हडपसर विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला महाविकास आघाडीने सोडल्याचे सोमवारी जाहीर केले. तसेच या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाचीही घोषणा केली. त्याबद्दल मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे .

या मतदारसंघातून मागच्या वेळी चेतन तुपे निवडून आले आहेत, ते नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेले. तरी सुद्धा या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाम असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी “महाविकास आघाडीची काल बैठक झाली, त्या बैठकीला सुषमा अंधारे नव्हत्या. अंतिम यादी येत नाही, तोपर्यंत आपण त्याविषयी बोलणार नाही. महाविकास आघाडीत समज-गैरसमज होईल, असे बोलणार नाही. मी एक जबाबदार खासदार आहे. अंधारे यांना फोन करून विचारणा करू,’ असे स्पष्ट शब्दात सांगितले.

तसेच शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, “अंधारे यांना पत्रकार परिषदेत पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्यांनी हडपसर मतदारसंघाबाबत केवळ दावा केला आहे. प्रत्यक्षात पक्षाचे काम व संघटन कोथरूड, वडगाव शेरी, हडपसर व खडकवासला या चारही मतदारसंघांमध्ये आहे.” असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये