“अंदाज कुछ अलग हैं उनके सोचने का…”, अमृता फडणवीसांनी नितीन गडकरींना दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
मुंबई | Amruta Fadnavis – आज (27 मे) केद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा 66वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक नेतेमंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही गडकरींना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी नितीन गडकरी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी हटके कॅप्शन देखील दिलं आहे. “अंदाज कुछ अलग हैं उनके सोचने का, सबको मंजिल का शौक है और उन्हें रास्ते बनाने का”, असं कॅप्शन अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.
पुढे त्यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमचे दूरदर्शी नेते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्यांनी संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात रस्ते उभारून आपला ध्येयापर्यंतचा प्रवास सोपा केला आहे, असंही अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या त्यांच्या या पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधलं आहे.