आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना बलात्कार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स
मुंबई – Kedar Dighe – Mumbai Police : शिवसेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी नवीन नियुक्त झालेले आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना मुंबई पोलिसांकडून एका २३ वर्षीय तरुणीच्या बलात्कार प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. केदार यांचे मित्र रोहित कपूर यांच्याविरोधात तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झालेला आहे. तरुणीला धमकी दिल्याप्रकरणी केदार दिघे यांना मुंबई पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर दिघे यांनी चौकशीला सहकार्य करावे असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.
मुंबई मधील एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यावर केदार दिघे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. सत्तेचा गैरवापर करून सामान्य शिवसैनिकांवर कारवाया कराल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर शिवसैनिकांना घेऊन मोर्चा काढावा लागेल असा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे.
काहीच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना शिवसेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केले होते. केदार दिघे यांनी अनेकवेळा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी एका भाषणात ‘आनंद दिघे यांच्या मृत्यूबाबत खरं काय आहे ते आम्हाला माहिती आहे’ असं वक्तव्य केलं होतं. त्यावर ‘तुम्हाला माहिती होते तर एवढ्या वर्षे काहीच का बोलले नाहीत’ असा सवाल शिंदे यांना विचारला होता. आपण शांत बसून आनंद दिघे यांचा विश्वासघात केला असल्याचं केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं होतं.