राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्र !!

सतीश ब. कुलकर्णी

युरोपात ठिकठिकाणी आपल्याला पूर्वीचे वैभवशाली आणि प्रशस्त राजवाडे पाहायला मिळतात. हे राजवाडे पाहत असताना नकळतच आपल्या देशातील तुटक्या-फुटक्या राजवाड्यांशी तुलना करीत असतो. थोडक्यात, पाश्चात्य स्थापत्यशास्त्र हे आपल्या प्राचीन स्थापत्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे आपण मनोमनी मान्य केलेले असते. पण आता मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे सरकार असताना जेम्स फर्ग्युसन (१८०८-८६) हा प्रसिद्ध स्कॉटिश वास्तुरचनाशास्त्रज्ञ भारतात वास्तव्याला होता. त्याने ‘हिस्ट्री ऑफ इंडियन अँड ईस्टर्न आर्किटेक्चर’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्या प्रस्तावनेत तो लिहितो, ‘भारतातील वास्तुकलेतील सिद्धांतानुसारच बाराव्या आणि तेराव्या शतकात युरोपमध्ये वास्तुकलेचा विलक्षण विकास झाला. भारतीयांनी निर्माण केलेल्या उत्कृष्ट वास्तु पाहण्याची संधी मिळालेल्या व्यकती त्यांच्या सफलतेचे रहस्य समजू शकतील. युरोपातील उत्तम शिक्षित आणि प्रतिभावान वास्तुरचनाकारांनी वारंवार केलेल्या चुका आणि अपयश ज्यांनी पाहिले असेल त्यांना ते तसे का अपरिहार्य होते, याची जाणीव भारतीय प्रतिकृतींच्या अभ्यासातून होते.’ म्हणजे युरोपातीले राजवाडे भारतीय वास्तुशास्त्र परंपरेनेच बांधले होते की!

वास्तुकला ही संस्कृतीचा गाभा असतेे. तशीच वास्तुकला माणसाच्या बौद्धिक उत्क्रांतीचा ठोस आणि टिकाऊ पुरावाही असतो. वास्तुकला ही स्थापत्यशास्त्राचे एक अंग आहे. स्थापत्यशास्त्र किंवा स्थापत्यकला यामागील मूळ शब्द ‘स्थापना’ आहे आणि या कलेमध्ये तज्ज्ञ असणार्‍या व्यक्तींना ‘स्थपती’ असे म्हटले जायचे. माणसाच्या निवार्‍याच्या गरजेतून वास्तुकलेचा जन्म झाला. माणसाच्या उत्क्रांतीबरोबर वास्तुकलेचाही विकास झाला. वास्तुकला ही भारतीय परंपरेत सांगितलेल्या चौसष्ट कलांपैकी एक कला मानली गेली आहे. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्रासंबंधी जास्त माहिती आपल्याला मत्स्यपुराण, स्कंदपुराण, अग्निपुराण, वायुपुराण, गरुडपुराण, नारदपुराण, विष्णुपुराण आदी पुराणांबरोबर मायामातम, वास्तुरत्नाकर, वास्तुराजवल्लभ, शिल्परत्न, शिल्पप्रकाश आणि बृहत् संहिता इ. ग्रंथांमधून वाचायला मिळते. दक्षिण भारतात ‘विश्वकर्माशिल्प’ आणि ‘मायामातम’ हे दोन ग्रंथ जास्त विचारात घेतले जातात आणि उत्तरेकडे ‘विश्वकर्मा प्रकाश’ आणि ‘समरांगणसूत्रधार’ हे दोन ग्रंथ विचारात घेतले जातात. विश्वकर्मा हा देवांचा ‘स्थपती’ म्हणजे देवांचा आर्किटेक्ट आणि माया हा असूरांचा आर्किटेक्ट होता. मायाचा एकच ग्रंथ ‘मायामातम’ आहे. पण विश्वकर्मांचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.

वास्तुशास्त्राच्या दोन मुख्य शाखा आहेत – १. दैवशिल्प आणि २. मानवशिल्प. दैवशिल्प हे धार्मिक वास्तु म्हणजे मंदिरे आणि यज्ञवेदी, होमहवनासाठी विचारात घेतले जाते. मानवशिल्प हे घरांसाठी, बाजारपेठांसाठी, गुरुकुल, इस्पितळे आदींसाठी वापरले जाते. स्थापत्याच्या दोन शाखा आहेत. एक स्थापत्यशास्त्र (सिव्हिल इंजिनिअरिंग) आणि दुसरी स्थापत्यकला (आर्किटेक्चर). या दोन्ही शाखांमध्ये प्राचीन भारतीयांनी केलेली प्रगती अतुलनीय आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मोठी धरणे बांधणे, नगरे वसविणे, मोठे जलाशय निर्माण करणे, मोठे राजमार्ग निर्माण करणे, मोठी मंदिरे बांधणे तसेच घरे बांधणे इ. गोष्टी येतात, तर स्थापत्यकलेत या सर्व गोष्टी आकर्षक करण्याकडे, तसेच अधिक सुविधा निर्माण करण्याकडे लक्ष दिले जाते. तमिळनाडूमधील ग्रँड अनिकत किंवा कलानाई हे इ. स. शकाच्या पहिल्या शतकात कावेरी नदीच्या वाहत्या पाण्यात चोला वंशातील कारीकलन नावाच्या राजाने बांधलेले धरण अजूनही वापरण्यात येते. हे धरण मुख्यतः कावेरी नदीचा प्रवाह बदलण्यासाठी बांधले गेले. यांच्या कित्येक हजारो वर्षांपूर्वी रघुवंशातील भगिरथ नावाच्या राजाने गंगेचा चीनकडे जाणारा प्रवाह बदलून तो भारताकडे वळविल्याची गोष्ट आपण फक्त ऐकलेली आहे. नगररचनेच्याबाबतीत तर मोहेंजोदडो हडप्पा संस्कृतीने तर जगाला आश्चर्यचकित केले आहे. इ. स.पूर्वी २५०० वर्षे अस्तित्वात असलेल्या या संस्कृतीमधील नगररचना, हे लोक त्या काळी किती पुढारलेले होते, याची साक्ष देतात. संशोधनात आढळलेले आणि त्या काळी वापरले गेलेले उच्च प्रतीचे बांधकाम साहित्य, उच्च प्रतीची बांधणी या सर्व गोष्टी आश्चर्यकारकच आहेत. पद्धतशीर बांधलेले दक्षिणोत्तर सरळसोट जाणारे रस्ते आणि त्यांना काटकोनात छेदणारे पूर्व-पश्चिम रस्ते पाहिल्यावर हे स्पष्ट होते, की ही नगरे बसविणारे कारागीर खूप अनुभवी आणि हुशार होते. नगरभर असलेले बंद गटारांचे जाळे हे सगळ्या प्राचीन संस्कृतींमधील एकमेव उदाहरण आहे. वास्तुनिर्मिती प्रमाणबद्ध होती आणि घरांमध्ये स्वयंपाकघर, स्नानघर, राहण्याच्या खोल्या आदी सुव्यवस्था होत्या.

उत्कृष्ट नगरनियोजनाचे प्राचीन भारतातील आणखी एक दुर्मिळ उदाहरण म्हणजे तमिळनाडूतील कांजीवरम हे गाव. सार्‍या जगातील नगरनियोजनतज्ज्ञ हे कांजीवरमचे नियोजन पाहून थक्क होतात. प्रा. गेडेड यांच्यासारख्या पाश्चात्त्य नगरनियोजनतज्ज्ञांनी कांजीवरमचे नियोजन हा नगरनियोजनासंबंधी भारतीय चिंतनाचा उत्कृष्ट नमुना आहे, असे नमूद करून ठेवले आहे.

पाणी हे सर्व सजीवांसाठी अत्यंत आवश्यक आहे. प्राचीन भारतीयांनी पाण्याच्या योग्य नियोजनाचा खूप अभ्यास केलेला दिसतो. हडप्पा संस्कृती (इ. पू. २५०० वर्षे) च्या काळात हे नियोजन कसे होते, ते आपण या ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननाच्या ठिकाणी भेट दिल्यास पाहू शकतो. या परिसरातून वाहणार्‍या नद्यांना बांध घालून त्यांचे पाणी शहरांकडे वळवण्यात आले. हे करत असताना पुराच्या पाण्याचा धोका त्यांनी अत्यंत कल्पकतेने टाळला. याच काळात सौराष्ट्रातील लोथल येथे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी बांधलेले बंदर हे जगातील पहिले मोठे बंदर होते. त्याची पूर्ण रचना आणि बांधणी त्या काळाच्या कित्येक शतके पुढची होती. संपूर्ण भारतभर पाण्याच्या नियोजनासाठी कृत्रिम जलाशयाचे निर्माण केलेले दिसते. उदाहणार्थ ः १. अरिकेशरी मंगलम येथील जलाशय (इ. स. १०१०), २. गंगा हकोदा चोलपूरम जलाशय (१०१२-१०१४), ३. भोजपूर कृत्रिम तलाव (११ वे शतक). भोपाळजवळील २५० चौ. मैल (सुमारे ६५० चौ. कि. मी.) परिसरात हा तलाव पसरलेला आहे. परमार कुलातील राजा भोज याने यांची निर्मिती केली. या तलावात ३६५ जिवंत झरे आहेत. ४. विशाखापट्टणम येथील अलमंदा जलाशय (११ वे शतक), ५. राज्य टाका तलाव (११ वे शतक) ६. इ. १५२० मध्ये, नागलपूरला पाणीपुरवठा करण्यासाठी राजा कृष्णराज याने या नागलपूर जलाशयाची निर्मिती केली. यासाठी त्याने पाण्याखाली बोगदा आणला. त्याला ‘हिंदू अंडरग्राऊंड टनेल’ असे नाव पडले.
कलात्मक स्थापत्याची चिरकालीन उदाहरणे द्यायची झाल्यास आपल्याला प्राचीन मंदिरांकडे पाहायला हवे. यापैकी बहुतेक मंदिरांना आज एक सहस्त्र वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरीसुद्धा ही मंदिरे अजूनही कुठलीही पडझड न होता आणि वारा-वादळ आणि भूकंपांसारख्या संकटांना तोंड देत होती तशीच दिमाखात उभी आहेत. ओडिशामधील लिंगराज मंदिर या स्थापत्यकलेचा एक उत्तम पुरावा आहे.

हे मंदिर ५२०x४६५ चौरस फूट क्षेत्र व्यापते. मंदिराची उंची १४४ फुट आहे. त्याभोवती ७.५ फुट जाडीची संरक्षक भिंत आहे. या मंदिरातील देवदेवतांच्या घडविलेल्या सुंदर मूर्ती अगदी सजीव असल्यासारख्या वाटतात. खजुराहो येथील मंदिरे ९ व्या शतकातील आहेत. प्रारंभीच्या ८५ मंदिरांपैकी आता फक्त २० मंदिरे शिल्लक राहिली आहेत. ही मंदिरेसुद्धा शिल्पकलेची अप्रतिम उदाहरणे आहेत. दक्षिण भारतातील श्रीरंगपट्टण येथील मंदिर हे सर्वात मोठे आणि शिल्पकलेचे उत्तम प्रतीक आहे. या मंदिरात एक हजार स्तंभ असलेला मंडप आहे आणि ४५०x१३० फूट इतके विशाल सभागृह आहे. मदुराईचे मीनाक्षी मंदिरसुद्धा अतिविशाल आहे. त्याची लांबी ८५० फूट, रुंदी ८०० फूट आणि उंची १६० फूट आहे. इथेसुद्धा हजार खांबांचा मंडप आहे. प्रत्येक स्तंभाची कारागिरी, त्यावरील देवदेवतांच्या मूर्ती आणि त्यांचे चेहर्‍यावरील भाव विलक्षण आणि खरोखरच चकीत करणारे आहेत. शिवाय गुजरातमधील गिरनार मंदिरेही त्यांच्या अप्रतिम कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. अशा प्रकारे संपूर्ण भारतातील हजारो मंदिरे, महाल आणि विशाल प्रासाद हे प्राचीन शिल्पकलेची गाथाच आपल्याला सांगत असतात. कुठलीही वास्तु बांधताना काय काळजी घ्यावी हे सुद्धा वास्तुशास्त्रात सविस्तरपणे दिले आहे. मत्स्यपुराण, भृगुसंहिता, काश्यपशिल्प आदी ग्रंथामध्ये दिलेली काही अनोखी माहिती — यावत्तत्र जलं दृष्टं खनेत्तावत्तु भूतले !! (पाणी लागेपर्यंत जमीन खणावी) रत्निमात्रमधे गर्ते परिक्ष्य खातपूरणे !

अधिके श्रियमाप्नोति न्यूने हानिं समे समम् !!
(जिथे वास्तु बांधायची ती जमीन एक हातभर खणावी. आणि त्यातून निघालेल्या मातीने तो खड्डा पुन्हा भरावा. खड्डा भरून माती शिल्लक राहिली तर ती वास्तू लाभदायक समजावी आणि खड्डा भरायला माती कमी पडली तर ती वास्तु त्रासदायक ठरेल आणि माती बरोबर पुरली तरी तिथे वास्तु बांधावी.) बांधकामाचे वीटा,चूना आदी सामान इतके वैशिष्टपूर्ण होते की त्यांचा वापर करून बांधलेल्या वास्तु हजारो वर्षे शाबूत राहील्या. मोहेंजदरो आणि हराप्पा येथिल उत्खननात प्राप्त झालेल्या विटा ब्रिटिशांनी भारतात रेल्वेचे रुळ टाकताना मजबूत भर घालण्यासाठी वापरल्या, अशी नोंद आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये