प्राचीन भारतीय नौकानयन आणि नौका बांधणी व्यवसाय

सतीश ब. कुलकर्णी
हिंदू धर्मात समुद्रांतर प्रवासाला बंदी असल्यामुळे हिंदू हिंदुस्थान सोडून गेले नाहीत आणि याचा फायदा जन्मतःच दर्यावर्दी असणार्या युरोपियन लोकांनी घेतला आणि भारतावर राज्य केले. हा दावा करणार्या लोकांनी इतिहास वाचला नसावा, असे नाही, पण जाणूनबुजून असा प्रचार करण्यामागे हिंदूंमध्ये एकप्रकारचा भ्रमाचा माहोल निर्माण करण्याची शक्यता जास्त वाटते. श्रुतींमध्ये म्हणजे वेदांमध्ये याविषयी काही उल्लेख सापडत नाहीत. पण मनुस्मृतीमध्ये मात्र समुद्रांतराविषयी कडक कायदेही केलेले दिसतात (अ.३, श्लोक १५८). हे कायदे फक्त उच्च वर्गातील म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय किंवा व्यापारी लोकांसाठी होते. पण कोळी समाज आणि इतर मागासवर्गीयांसाठी नव्हते. कायदा म्हटला की, त्याला शिक्षाही हवीच. ब्राह्मण वर्गापैकी कोणी समुद्रांतर केले तर त्याला त्यानंतर पितरांचे श्राद्ध करता येत नसे. तसेच सर्वांसाठी एक कॉमन शिक्षा होती. ती म्हणजे त्या व्यक्तीची जातच नष्ट होत असे. अर्थात मनुस्मृतीमध्ये यावर प्रायश्चित्ताचा उपायही सांगितला आहे. बहुतेक सर्व व्यापारीवर्ग हे प्रायश्चित्त नेमाने दरवर्षी घेऊन आपला समुद्रांतर व्यापार चालू ठेवत असावेत. अगदी अलीकडच्या काळात रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, विवेकानंद आणि प्रसिद्ध गणिती रामानुजन यांनीही समुद्रांतर प्रवासासाठी प्रायश्चित्त घेतले होते.
प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता, असे आपण अनेकवेळा ऐकलेले असते. पण हा धूर कशामुळे निघत होता, याची चर्चा क्वचितच होताना दिसते. प्राचीन काळापासून भारत जगातील सर्वांत श्रीमंत राष्ट्र झाले ते व्यापाराच्या जोरावर. अगदी वेदकाळापासून भारतीय व्यापारी जगभर फिरून त्यांचा माल विकत असत. जगभर फिरायचे तर समुद्र प्रवासाला पर्याय नव्हता. मोहंजोदडो आणि हडाप्पा येथे झालेल्या उत्खननातून हे सिद्ध झाले आहे की, इ.स.पूर्व ३५०० वर्षांच्या ही आधीपासून भारतीयांचे मेसापोटेमिआ संस्कृतीशी व्यापार संबंध प्रस्थापित झाले होते. भारतीय आणि चिनी व्यापार्यांचे जागतिक व्यापारावर पूर्ण वर्चस्व होते. भारतीय व्यापारी पूर्वेला इंडोनेशिया आणि व्हिएतनामपर्यंत जाऊन पोहोचले होते. सुरक्षित समुद्र प्रवासासाठी आवश्यक असणारी सर्व साधने त्यांच्या वापरात होती. यापैकी एक साधन म्हणजे चुंबकीय दिशादर्शक (मॅग्नेटिक कंपास). त्याला मत्स्ययंत्र म्हणत होते. ‘इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल आर्किटेक्चर अँड शीपबिल्डींग इन इंग्लंड’ या संस्थेचे (विसाव्या शतकाच्या सुरुवातीला) सन्माननीय सदस्य असलेले प्रसिद्ध युरोपीयन तज्ज्ञ जे. एल. रीड यांनीच याबाबतीत केलेले विधान असे –
‘The early Hindu astrologers are said to have used the magnet, in fixing the North and East, in laying foundations and other religious ceremonies. The Hindu compass was an iron fish that floated in a vessel of oil and pointed to the North. The fact of this older Hindu compass seems placed beyond doubt by the Sanskrit word Maccha Yantra, or fish machine, which Molesworth gives as a name for the mariner’s compass’.
हेच मत्स्ययंत्र अरब व्यापार्यांमार्फत युरोपमध्ये पोहोचले आणि आधुनिक स्वरूपात जगापुढे आले. भारताचा नौकानयन इतिहास फक्त ५००० वर्षांपुरता मर्यादित नसून त्यांच्या आधीही भारतीय नावाड्यांना सागरप्रवासाची कला, नौकानयन आणि सागरी प्रवासाचे प्रचंड ज्ञान होते, हे स्पष्ट करणारे अनेक पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. ‘नेव्हिगेशन’ या शब्दाची व्युत्पत्ती ‘नावगती’ या मूळ संस्कृत शब्दापासून झालेली आहे. इ.स.पूर्वी ३५०० वर्षांच्या काळात मोहंजोदडो आणि लोथल ही महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. पश्चिम आशियाई आणि अरब राष्ट्रांतून होणार्या व्यापारामुळे उत्तर टोकावर वसलेल्या लोथल बंदरात मोठ्या नावा आतपर्यंत येऊ शकत होत्या. त्याची बांधणी इ.स.पूर्वी २५०० इतकी प्राचीन आहे. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मलबार किनारपट्टीचा विकासही अन्य देशांबरोबर समुद्रमार्गे होणार्या व्यापारामुळे झाला.
विविध प्रकारच्या आणि विविध कामांसाठी लागणार्या नौका बांधणीमध्ये तर भारत अगदी १९व्या शतकापर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर होता. ऋग्वेद, ब्राह्मण ग्रंथ, रामायण, महाभारत आणि अनेक पुराणे, तसेच कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील नावाध्यक्ष प्रकरण, ५ व्या शतकातील वराहमिहीरकृत ‘बृहत् संहिता’, ११ व्या शतकातील राजा भोज याने स्वतः लिहिलेल्या ‘युक्ती कल्पतरू’ अशा अनेक ग्रंथांतून आपल्याला नौकांचे त्यांच्या उपयोगाप्रमाणे विविध प्रकार, त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्या तयार करण्यासाठी लागणारे कौशल्य याविषयी भरपूर माहिती मिळते. वाल्मीकी रामायणातील अयोध्याकांडात, शेकडो योद्धे बसू शकतील अशा मोठ्या नौकांचा उल्लेख आहे.
नावां शतानां पज्चानां कैवर्तानां शतं शतम् !
सन्नद्धानां तथा यूनान्तिष्ठंतीत्यभ्यचोदयात् !!
(म्हणजे शेकडो ‘सन्नद्ध’ युवकांनी भरलेल्या पाचशे नावांना शेकडो कोळी प्रेरणा देतात.) ‘युक्ती कल्पतरू’ हा नौका बांधणीविषयीचा एक परिपूर्ण ग्रंथ आहे. भोज राजा म्हणतो, वेगवेगळ्या झाडांच्या लाकडांपासून बनवलेल्या नौकांचे गुणधर्म निरनिराळे असतात. कमी प्रतीच्या लाकडापासून बनवलेली जहाजे फार दिवस तग धरू शकत नाही. सागाचे लाकूड जहाज बांधणीसाठी सर्वोत्तम समजले जाते. तसेच, सागर प्रवास करणार्या जहाजाच्या तळाच्या लाकडी फळ्या जोडण्यासाठी लोखंडी खिळे, पट्ट्या इ. वापरल्यास सागर तळाशी असलेल्या लोहचुंबकीय खडकांकडे लोखंडी सामान आकर्षिले जाऊन जहाज बुडू शकते, असेही तो सांगतो. या ग्रंथामध्ये नौकांचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत. १ सामान्य आणि २ विशेष. मोठमोठ्या नद्यांमधून जाणार्या त्या सामान्य नौका आणि समुद्रातून जाणार्या त्या विशेष नौका. सामान्य नौकांचे क्षुद्रा, मध्यमा, भीमा, चपला, पटला, भया, दीर्घा, पत्रपुटा, गर्भरा, मन्थरा असे प्रकार त्यांच्या आकारानुसार केले आहेत. क्षुद्रा नौकेची लांबी १६ हात, रुंदी ४ हात आणि उंची ४ हात. (एक हात साधारणपणे ३ फूट इतका असावा). मन्थरा या नदीतून जाणार्या सर्वात मोठ्या नौकेची लांबी १२० हात, रुंदी ६० हात, तर उंची ६० हात इतकी होती. विशेष नौका दोन प्रकारांत विभागल्या होत्या. १. दीर्घा आणि २. उन्नता. दीर्घा प्रकारच्या नौकांचे परत दीर्घिका, तरणि, लोला, गत्वरा, गामिनी आणि तारी हे उपप्रकार. दीर्घिकेची लांबी ३२ हात, रुंदी ४ हात आणि उंची ३.५ हात. तर तारी या मोठ्या नौकेची लांबी ११२ हात, रुंदी १४ हात आणि उंची ११.५ हात. तसेच, उन्नता प्रकारातील सर्वात मोठ्या वेगिनी नौकेची लांबी १७६ हात, रुंदी २२ हात आणि उंची १८ हात. मंथरा या दुसर्या मोठ्या समुद्रातून जाणार्या नौकेची लांबी ९६ हात असली तरी रुंदी आणि उंची मात्र वेगिनीपेक्षा खूप जास्त म्हणजे ४८ हात इतकी होती.
प्राचीन भारतीयांनी प्रचंड मोठमोठ्या नौका बांधल्या. पण त्या बहुतेक सगळ्या मालवाहतुकीसाठी होत्या. दुसर्या देशांवर आक्रमण करण्याचे धोरण भारतीयांनी कधीच स्वीकारले नसल्याने युद्धनौका बांधण्याची गरज त्यांना वाटली नाही. भारतीय नौकांविषयी त्या काळातल्या परदेशी लोकांच्या काही प्रतिक्रिया पाहू. मार्को पोलो हा प्रवासी १३ व्या शतकात भारतात आला होता. त्याने लिहिले आहे, भारतीय जहाजे इतकी मोठी असतात की, एकेका जहाजामध्ये ३०० नावाडी आणि ४००० पोती माल लादला जाऊ शकतो. १५ व्या शतकात भारतात आलेल्या निकोलो कांटी नावाच्या प्रवाशाने लिहिले आहे की, भारतीय जहाजे आमच्या जहाजांपेक्षा खूपच मोठी आहेत. त्यांचा तळ तिहेरी तक्त्यांचा बनलेला असतो. ही जहाजे भीषण समुद्री वादळांना समर्थपणे तोंड देऊ शकतात. काही जहाजे अशी असतात की, त्यांचा एक भाग निकामी झाला तरी ती व्यवस्थित सुखरूप मार्गक्रमण करू शकतात. बर्थमा नावाच्या आणखी एका प्रवाशाने लिहिले आहे की, लाकडी फळ्यांची जोडणी इतकी अप्रतिम असते की, पाण्याचा एक थेंबही आत पाझरत नाही. या जहाजांची शिडे सुती कापडाची असतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हवा भरली जाते. १७ व्या शतकापर्यंत पाश्चात्त्य देशांची जहाजे जास्तीत जास्त ६०० टन मर्यादेची होती, तर त्यावेळी भारतीय जहाजे १५०० टन मर्यादेपर्यंतची होती. ईस्ट इंडिया कंपनीनेसुद्धा प्रारंभीच्या काळात भारतीय जहाजे वापरायला सुरुवात केली. १८११ मध्ये लेफ्टनंट वॉकर या कंपनीच्या अधिकार्याने लिहिले, ब्रिटिश बनावटीच्या जहाजांना दर १२ वर्षांनी दुरुस्ती करावी लागते, तर सागवानी लाकडाने बांधलेली भारतीय जहाजे २५ वर्षांपर्यंत बिनादुरुस्ती वापरता येतात. ईस्ट इंडिया कंपनी जवळ ‘दरिया दौलत’ नावाचे एक जहाज होते. ते सलग ८७ वर्षे बिनादुरुस्ती वापरले गेले. प्रारंभीच्या काळात कंपनीने युद्धनौकाही भारतात बांधून घेतल्या. मुंबईच्या कारखान्यात १७३६ ते १८६३ पर्यंत ३०० जहाजे बांधली गेली आणि त्यापैकी बरीचशी कंपनीने त्यांच्या ताफ्यात समाविष्ट केली. ‘एशिया’ नावाच्या जहाजावर ८४ तोफा बसवण्यात आल्या.
ब्रिटिश जहाज बांधणी कंपन्यांना भारतीय जहाजांचे वर्चस्व सहन करणे शक्यच नव्हते. कंपनीच्या एका अधिकार्याने लिहिले आहे की, माल भरलेली भारतीय जहाजे लंडन बंदरात पोहोचली तेव्हा इंग्रज व्यापार्यांमध्ये खूपच घबराट उत्पन्न झाली. ब्रिटिश गोदी कामगारांनीही आंदोलने करायला सुरुवात केली. शेवटी १९१४ साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून भारतीय बनावटीच्या जहाजांना इंग्लंडच्या बंदरांमध्ये येण्यावर बंदी केली. अशा रीतीने भारतीय जहाजबांधणी कौशल्याचा ब्रिटिशांनी गळा घोटला. हे पाहून सर विल्यम डिग्वी यांनी म्हटले, ‘पाश्चात्त्य जगाच्या राणीने प्राच्य सागराच्या राणीचा वध केला’. ब्रिटिशांनी भारतात विज्ञान आणले, असे म्हणणार्यांनी हा इतिहास एकदा तरी वाचावा, ही अपेक्षा.
संदर्भ : १.”इंडियन शिपिंग”, लेखक डॉ.राधा कुमुद मुखर्जी.
२. भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा, लेखक – सुरेश सोनी.
३. प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान. प्रकाशक, विज्ञान भारती.