“निवडणूक लढवणार तर ती मशाल चिन्हावरच”, ऋतुजा लटकेंचं स्पष्टीकरण!

मुंबई | Andheri East Bypoll Election 2022 – ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना शिंदे गटात आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करीत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll Election) ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. मात्र या सर्व चर्चांना आता ऋतुजा लटकेंनी पूर्णविराम दिला आहे. आमची निष्ठा उद्धव ठाकरेंशीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यावेळी ऋतुजा लटके म्हणाल्या, “माझ्यावर कोणताही दबाव नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भेटलेली नाही. अंधेरीतील पोटनिवडणूक मी मशाल चिन्हावरच लढणार. आमची जी निष्ठा आहे ती, उद्धव साहेबांसोबतच आहे. माझे पती रमेश लटके यांचीही निष्ठा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बाळासाहेबांसोबत (Balasaheb Thackeray) होती. आता मी महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहे. राजीनाम्यासंदर्भात पुन्हा एकदा विनंती करणार आहे की, मला आजच्या आज राजीनामा देण्यात यावा.”
“मला अशी महिती देण्यात आली आहे की, सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. फक्त एक सही शिल्लक आहे”, अशी माहितीही ऋतुजा लटकेंनी दिली. तसंच मी निवडणूक लढवणार तर ती मशाल या चिन्हावरच लढणार, असंही त्या म्हणाल्या.