
मुंबई : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत दिसत आहेत. तसा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकायुक्त कायदा करायला चालढकल करत आहेत. दोन वर्षे झाली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकायुक्त कायद्यावर बोलायला तयार नाहीत असा असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्याबाबत कायदा करा अन्यथा पदावरुन पायउतार व्हा, असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.
अण्णा हजारे म्हणाले की, राज्यात पुन्हा एकदा आंदोलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक राज्यांमध्ये जिल्हा स्तरावरील बैठका सुरु झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यात आज कमीत कमी दोनशे कमिट्या स्थापन झाल्या आहेत. लवकरच या कमिट्यांच्या बैठका झाल्या, बांधणी झाली की महाराष्ट्रातील ३५ जिल्हे आणि एकाच वेळेला ३०० तालुक्यांमध्ये आम्ही लोकायुक्त कायद्यासाठी आंदोलन छेडणार आहोत. लोकायुक्त कायदा करा नाहीतर पायउतार व्हा, असा थेट इशाराच हजारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.