ताज्या बातम्यादेश - विदेश

अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; दिल्लीतील महिलांना महिन्याला मिळणार ‘एवढे’ रुपये

आगामी २०२५ मध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीतील १८ वर्षांवरील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरमहा २१०० रुपये जमा केले जातील, असे केजरीवाल यांनी गुरुवारी सांगितले. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांच्या उपस्थितीत केजरीवाल यांनी ही योजना जाहीर केली.

अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी महिला सन्मान योजनेची (Mahila Samman Yojana) घोषणा केली. या योजनेंतर्गत दिल्लीतील आप सरकार महिलांना दरमहा १००० रुपये देणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेची रक्कम दरमहा २,१०० रुपये करण्यात येईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, “आज मी दिल्लीतील लोकांसाठी दोन मोठ्या घोषणा करत आहे. दोन्ही घोषणा महिलांसाठी आहेत. मी आश्वासन दिले होते की मी प्रत्येक महिलेला १ हजार रुपये आर्थिक साहाय्य दिले जाईल. हा प्रस्ताव आज सकाळी मुख्यमंत्री अतिशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. येत्या १० ते १५ दिवसांत निवडणुका जाहीर होतील. त्यामुळे सध्यातरी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणे शक्य नाही. काही महिलांचे म्हणणे आहे की सध्याची महागाई पाहाता १ हजार रुपये पुरेसे नाहीत. त्यासाठी आम्ही महिलांना दरमहा २,१०० रुपये देणार आहोत. या योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होईल.’’

आप आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी (दि.११) काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. “महिला आपल्या देशाचे भविष्य घडवतात. त्यांच्या कामाला हातभार लावणे हे आम्ही आमचे सौभाग्य समजतो. दिल्लीतील दोन कोटी लोकांच्या सोबतीने आम्ही सर्वात मोठे अडथळे पार केले. दिल्लीतील लोकांसाठी चांगले काम करण्यापासून कोणताही अडथळा आम्हाला रोखू शकला नाही.” असे ते पुढे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये