ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“…अन् तोच दाढीवाला बाबा फडणवीसांच्या माडींवर जाऊन बसलाय”, अरविंद सावंतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

मुंबई | Arvind Sawant On CM Eknath Shinde – शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) हे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल (9 जानेवारी) अमरावती येथे ‘मशाल यात्रे’दरम्यान आयोजित सभेत बोलताना शिंदे सरकारवर (Shinde Government) जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) माडींला मांडी लावून मी कसा बसू? म्हणणारे आज त्याच फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसलेत, अशी टीका अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली आहे.

“तत्कालीन भाजप (BJP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी 2014 मध्ये युती तुटली असं जाहीर केलं होतं. 2012 मध्ये भाजपला वाटलं की बाळासाहेबांचं निधन झालं. त्यामुळे आता शिवसेनेचं काही खरं नाही. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहेत. त्यांना चेपून काढता येईल. मात्र, 2014 मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाजपविरोधात एकटे उभे राहिले होते. तसंच शिवसैनिकांनी समर्पित होऊन काम केलं आणि पराक्रम घडला. त्यावेळी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले. शिवसेना विरोधात बसली होती, आज जे दाढीवाले मिंधे सोडून गेले त्यांनाच विरोधी पक्षनेते केलं होतं. तरीही सत्तेसाठी त्यांचा जीव खालीवर होत होता”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

पुढे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “2014 मध्ये एकनाथ शिंदे यांनीच उद्धव ठाकरेंना भाजपबरोबर सत्ता स्थापन करण्याची मागणी केली होती. तेव्हाही हे उद्धव ठाकरेंना मान्य नव्हतं. केवळ त्या मिंधे लोकांसाठी त्यांनी पुन्हा भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. मी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीवेळी प्रचाराला व्यासपीठावर होतो. त्यावेळी याच दाढीवाल्या बाबानं मोठी नाटकं केली होती. एक मोठा अर्ज लिहून आणला होता. ‘साहेब, आपल्या सामान्य माणसांची कामं होत नाहीत. गरिबांना न्यान मिळत नाही. त्यामुळे यांच्या मांडीला मांडी लावून मी कसा बसू? माझा राजीनामा घ्या’, असं ते म्हणाले होते. मात्र, आज तोच बाबा देवेंद्र फडणवीसांच्या मांडीवर जाऊन बसलाय”, असंही अरविंद सावंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये